पंतप्रधान कार्यालय

इंडोनेशियातील भारतीय समुदाय कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण (30 मे, 2018)

Posted On: 30 MAY 2018 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2018

 

इंडोनेशियामध्ये भारतीय मुल्ये जपत जगणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार

सलामत सोरे, तमान-तमान (शुभ संध्याकाळ मित्रांनो)

आपा काबार? (तुम्ही कसे आहात)

साया सनांग सकाली बर अदा दी सिनी (मला येथे येऊन खूप आनंद झाला आहे)

रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये माझे स्वागत करणाऱ्या तुम्हा सर्वांचा आणि विशेषतः राष्ट्रपती विडोडो यांचा आभारी आहे. आज सकाळी इंडोनेशियाच्या विविधतेची झलक देखील मला पहायला मिळाली. विविध पोशाख परिधान केलेल्या नागरिक आणि मुलांनी माझे स्वागत केले. हे सर्व खूपच हृदयस्पर्शी होते.

मित्रांनो,

काही महिन्यांपूर्वीच, आम्ही सर्व 10 आसियन नेत्यांसह भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला. इंडोनेशिया हा आशियानमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला महत्त्वाचा सदस्य आहे. मी राष्ट्रपती विडोडो यांचा आभारी आहे ज्यांनी त्यावेळी आम्हाला त्याचे आदरातिथ्य करण्याची संधी दिली. 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते हा केवळ योगायोग नव्हे.

मित्रांनो,

गेल्या चार वर्षात सव्वाशे कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून मी जगभरात जिथे जिथे गेलो तिथे, मूळ भारतीय असलेल्या तुमच्या सारख्या लाखो बंधू भगिनींना भेटण्याचा प्रत्येकवेळी मी प्रयत्न केला. या दरम्यान मी जितक्यावेळा संवाद साधला या सगळ्यात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे भारत भूमी प्रती अतूट श्रद्धा आणि सन्मान. येथे इंडोनेशियामध्ये देखील माझ्यासमोर हीच भावना दिसत आहे. इंडोनेशियासाठी तुमची जी निष्ठा आहे तितकीच गाढ निष्ठा तुमची तुमच्या मूळ भूमीशी देखील आहे. तुमच्यातील बरेच लोक इंडोनेशियाचे नागरिक आहेत, पण तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात भारत देखील आहे.

मित्रांनो,

आपले संस्कृत आणि संस्कृतीचे संबंध आहेत आणि आज इंडोनेशियात स्थायिक झालेले तुम्ही सर्व या नातेसंबंधाचा मजबूत दुवा आहात. तुमच्यातील कित्येक जण येथे चार-पाच पिढ्यांपासून रहात असाल, तर अनेक लोकं येथे दोन-तीन दशकांपासून आहेत. आज तुमच्यातील कोणी कापडाचा व्यापार करत असेल तर कोणी खेळाच्या सामानाचा व्यापार करत असेल. कोणी अभियंता आहे तर कोणी सल्लागार. कोणी सीए आहे तर कोणी बँकर तर कोणी अध्यात्मिक गुरु. 1962 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत मूळ भारतीय असलेल्या गुरनाम सिंग यांनी इंडोनेशियासाठी पदक जिंकले. मला खूप आनंद आणि गर्व आहे की, तुम्ही सर्वांनी तुमच्या कठोर परिश्रमांनी स्वतःला केवळ इथल्या वातावरणाच्याच अनुकूल बनविले नाही तर तुम्ही सर्वांनी इंडोनेशियाच्या विकासात देखील आपले योगदान देत आहात.

मित्रांनो,

एक काळ असा देखील होता जेव्हा तुमच्या पूर्वजांना वेगवेगळ्या परिस्थितीमुळे भारतातून जावे लागले होते. आज, एक अशी वेळ देखील आहे जेव्हा संपूर्ण जगामध्ये भारताची एक मजबूत ओळख झाली आहे. गेल्या 4 वर्षात, भारताने जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अमुल्य काम केले आहे.

  • आज भारत जगातील सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था आहे. भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक होत आहे.
  • भारताचे परकीय चलन विनिमय 300 अब्ज डॉलर वरून 400 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले आहे.
  • ग्रीनफिल्ड एफडीआय आकर्षित करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश आहे.
  • एफडीआय आत्मविश्वास निर्देशांकामध्ये दोन उदयोन्मुख बाजारांपैकी भारत एक आहे.
  • जागतिक आर्थिक मंचच्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये, भारताचे स्थान 71 वरून 40 वर पोहोचले आहे.
  • व्यापार सुलभीकरण क्रमवारीत भारत 142 व्या स्थानावरून 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.
  • लॉजिस्टिक्स कामगिरी निर्देशांकात 19 गुणांची सुधारणा झाली आहे.
  • जागतिक नवोन्मेश निर्देशांकात भारताच्या स्थानात  21 अंकांनी सुधारणा झाली आहे.
  • अंकटाडच्या अहवालात, भविष्यातील सर्वात मजबूत तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे.
  • गेल्या 14 वर्षात प्रथमच मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग सुधारले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, तर इंडोनेशियात देखील लोकशाहीची मूल्ये फारच मजबूत आहेत. हेच कारण आहे की ज्याप्रमाणे सव्वाशे कोटी भारतीयांनी माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला  पंतप्रधान होण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे इंडोनेशियाच्या लोकांनीही विडोडोजी यांना आपले राष्ट्रपती म्हणून निवडले. मित्रांनो, भारत आणि इंडोनेशिया हे सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेचे आणि सद्भावनेचे प्रतीक आहेत. येथे अनेक भाषा बोलल्या जातात, शेकडो समुदाय राहतात, तर भारतात देखील, कोस-कोस पर बदले पानी, चार कोस पर वाणी ही म्हण प्रसिद्ध आहे. मी कुठेतरी वाचले आहे की इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर सुमारे 1700 वर्षांपूर्वीचे अवशेष आहे, जे भारताशी संबंध असल्याचा पुरावा आहेत. आता तीन-चार दिवसांपूर्वी मी ओदिशा येथे कटकमध्ये होतो. तिथे ज्या मैदानात भव्य जनसभेचे आयोजन केले होते त्याचे नाव होते बालीजात्रा’. ‘बालीजात्राचा अर्थ काय आहे? इंडोनेशिया मध्ये बालीचा प्रवास. शेकडो वर्षांपूर्वी, ओदिशातील महान खलाशी कटक इथून प्रवास सुरु करून जावा-सुमात्रामार्गे बोर्नियो पर्यंतचा प्रवास करत. आजही, दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ओदिशामध्ये बालीजात्राउत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुजरात सोबत देखील इंडोनेशियाचे जुने संबंध आहेत. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला कोणीतरी सांगितले होते की, 12 व्या शतकात कच्छमधून विस्थापित झालेले अनेक मुस्लिम इंडोनेशियात स्थायिक झाले. त्या लोकांसोबत गुजराती भाषा आणि गुजराती खाद्यसंस्कृती देखील इंडोनेशियात पोहोचली होती. मला सांगण्यात आले आहे की इंडोनेशियातील अनेक मुस्लीम कुटुंबांमधे बुबुर गुजरात, गुजराती खिचडी बनवली जाते. आजही असे अनेक शब्द वापरले जातात जे भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांवर प्रकाश टाकतात. जसे की, भावासाठी सहोदर’, मृत्यूसाठी माती’, रंगासाठी वर्ण’, ग्रुपसाठी समूहकिंवा समुअ’, ‘उपवास’, ‘पुवास’, ‘बहासाआणि भाषा’; ‘रुपियाहाआणि रुपया’. जर आपण असे शब्द गोळा केले तर संपूर्ण शब्दकोश तयार होईल. हे साम्य नैसर्गिक आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील अंतर फक्त 90 नॉटिकल मैल आहे. म्हणजे, आपण 90 नॉटिकल मैल दूर नाही, तर  90 नॉटिकल मैल जवळ आहोत. शेजारी आहोत.

मित्रांनो,

मला असे सांगण्यात आले आहे की भारत आणि इंडोनेशियातील दृढ सांस्कृतिक संबंध येथे अनेक प्रकारे साजरे केले जातात. येथे 'इंडोनेशिया तामिळ संगम' च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील एक वेगळी ओळख मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेल्यावर्षी जकार्ता आणि इतर ठिकाणी केलेल्या यशस्वी कार्यक्रमांबद्दल देखील मला माहिती दिली आहे. मला असे देखील सांगण्यात आले आहे की, बालीमधील प्रसिद्ध भारतीय पारंपरिक औषधे, पंचकर्म-आयुर्वेद केंद्रांची लोकप्रियता वाढत आहे. मागील काही वर्षांमध्ये समग्र आरोग्य सुविधांप्रती जगभराचे आकर्षण वाढले आहे. तुमच्यासाठी पारंपारिक भारतीय औषधांचे राजदूत होण्याची ही एक उत्तम संधी आहे.

मित्रांनो,

हे देखील एक योगायोग आहे की, काही दिवसांपूर्वी नेपाळमधील जनकपूर येथे माता जानकीचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली होती. आणि आज मी येथे इंडोनेशियामध्ये आहे जिथे रामकथेला एक नवीन भूमी आणि नवीन वातावरण मिळाले. इंडोनेशियाचे हे वैशिष्ट्ये आहे की येथे रामायणाचे सादरीकरण करणारे कलाकार मुस्लीम आहेत. आज, काही वेळापूर्वी, राष्ट्रपती विडोडो आणि मी पतंगांचे एक प्रदर्शन पाहिले. रामायण आणि महाभारता सारख्या कथा आणि परंपरांना इंडोनेशियाच्या सामान्य जीवनात विशेष स्थान आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. श्रद्धा आणि संस्कृती कशा प्रकारे एकत्रितपणे पल्लवित होत आहेत हे याचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे.

मित्रांनो,

गेल्या शतकात दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासून, आपण जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर एकमेकांशी सहकार्य करीत आहोत. मागील चार वर्षात आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. आज भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांनी नवीन उंची गाठली आहे. राजकीय असो, धोरणात्मक असो किंवा आर्थिक सहकार्य, भारत आणि इंडोनेशिया एकत्रितपणे एकत्रितपणे आव्हानांचा सामना करीत आहेत, संधींचा योग्य वापर करत आहेत. आज, भारत आणि इंडोनेशिया यांनी आपली धोरणात्मक भागीदारी वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती विडोडो आणि मी या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत याला सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला आहे. आमचे सैन्य एकत्रित युद्ध सराव करत आहे. सुरक्षे संदर्भातील मुद्द्यांवर देखील आमच्यामधील समन्वय वाढत आहे. आसियान देशांमध्ये आज इंडोनेशिया भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे. आज आपला व्यापार 18 अब्ज डॉलरहून अधिक आहे.

मित्रांनो,

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सशक्त संबंधाचे आणखी एक कारण म्हणजे आपले लोक. म्हणजे आपण सर्व. आमच्याकडे 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मोठी लोकसंख्या आहे. गेल्या चार वर्षात आमच्या सरकारने त्यांच्या उर्जेला योग्य दिशा आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच, माझ्या सरकारच्या कामकाजाची गती जलद आहे आणि मोजमाप फार व्यापक आहे. देशातील जनतेच्या आशा आणि अपेक्षांनुसार आम्ही सुशासनावर जोर दिला आहे, किमान सरकार, कमाल शासन यावर जोर दिला आहे. नागरी-प्रथम हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सरकार स्थानिक पातळीवर मोठे प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर पावले उचलत आहे. आमच्या सरकारने, भ्रष्टाचार मुक्त, नागरिक-केंद्र आणि विकासप्रणीत व्यवस्थेला सर्वात मोठे प्राधान्य दिले आहे. पारपत्रासाठी आता भारतातील लोकांना महिनोंमहिने वाट पहावी लागत नाही, दोन ते तीन दिवसात पारपत्र लोकांच्या घरी येते. इंडोनेशियासह 163 देशांमधील लोकांना ई-व्हिसा सुविधा देण्यात आली आहे. ई-व्हिसावर भारतात येणा-या पर्यटकांची संख्या 150 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील 1400 हून अधिक जुने कायदे रद्द करण्यात आले आहेत. वस्तू आणि सेवा कर - जीएसटीने भारताला एक चांगली कर प्रणाली दिली आहे, उत्तम महसूल प्रणाली दिली आहे.

मित्रांनो,

आम्ही देशातल्या नागरिकांसाठी सुलभ जीवनपद्धती आणि देशासाठी आधुनिक पायाभूतसुविधेच्या अनोख्या संयोगावर काम करत आहोत. आम्ही भारतात एक अशी कार्यप्रणाली तयार करत आहोत जी पारदर्शक असेल तसेच संवेदनशील देखील असेल.

 

  • रेल्वेमार्ग ब्रॉड गेजमध्ये परावर्तीत करण्याची गती दुप्पट झाली आहे.
  • रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण तिप्पट वेगाने केले जात आहे.
  • माझे सरकार गावांमध्ये दुप्पट वेगाने रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करत आहे.
  • पूर्वी ज्या वेगाने विद्युतीकरणाचे काम केले जायचे त्याच्या दुप्पट वेगाने आता हे काम होत आहे.
  • पूर्वीच्या केवळ 59 ग्रामपंचायतींच्या तुलनेत, आम्ही 1 लाख 10 हजार ग्राम पंचायतींहून अधिक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडले आहे.
  • पूर्वीच्या 28 सरकारी योजनांच्या तुलनेत आता 400हून अधिक योजनांचे पैसे थेट लोकांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.
  • याआधी जो एलइडी बल्ब साडे तीनशे रुपयांना मिळायचा तो आता 40-50 रुपयांना मिळतो.
  • पूर्वी भारतात केवळ दोन मोबाइल कंपन्या होत्या, आता त्यांची संख्या 120 हून अधिक झाली आहे. भारतात तयार होणाऱ्या मोबाईलमुळे आयातीवर होणारा खर्च कमी झाला आहे.

 

आज भारतात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होत आहेत, व्यवस्थापन महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत. केवळ गेल्या अडीच वर्षांत भारतात 9000 पेक्षा अधिक स्टार्ट-अपची नोंदणी झाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप प्रणाली भारतात उभी राहत आहे. आज जगभरात भारताच्या पारपत्राची ताकत वाढत आहे. भारत जगातील शक्तिशाली व्यवस्थेचा भाग बनला आहे. मानवाच्या कल्याणासाठी सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय सौर युतीचे नेतृत्व करणाऱ्या देशांपैकी एक आहे. 21 व्या शतकाची आवश्यकता, आशा, अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार भारत घडवण्याचा प्रयत्न आमचे सरकार करत आहे. नव भारताचा संकल्प घेऊन आज भारत पुढे मार्गक्रमण करत आहे. आम्हाला 2022 पर्यंत जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत नव भारताची निर्मिती करायची आहे.

मित्रांनो,

येथे इंडोनेशियामध्ये सुख आणि दुःखात एकमेकांना आधार देण्याची परंपरा आहे आणि वसुधैव कुटुंबकम मंत्रावर आपण अटळ आहात. मला सांगण्यात आले आहे की, अलीकडे बालीमध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्यावेळी त्यात अडकलेल्या हजारो भारतीय पर्यटकांचे बाली आणि सुराबायाच्या लोकांनी फक्त प्राणच नाही वाचवले तर त्यांना भारतात पाठवण्याची व्यवस्था देखील केली. या मानवतापूर्ण व्यवहारासाठी मी तुमची मनापासून प्रशंसा करतो आणि तुमचा आभारी देखील आहे. मानवी मूल्यांचे हेच संरक्षण भारताच्या वारशाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही भारतात देखील याच गौरवाने त्याचे पालन करतो. नेपाळमधील भूकंप असो किंवा मग श्रीलंकेतील पूरपरिस्थिती असो, संकट समयी मदतीसाठी सर्वात आधी उपस्थितीत राहणारा देश म्हणून जगभरात भारताची ओळख झाली आहे. रालोआ सरकारच्या काळात संकटात सापडलेल्या 90,000 भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणले आहे.

मित्रांनो,

इंडिया आणि इंडोनेशिया यांच्या केवळ नावातच समानता नाही. हा समन्वय केवळ तुक म्हणजे यमकातील नाही तर ताल म्हणजे तालबध्तेतील देखील आहे. हा समन्वय आपल्या संस्कृतीचा आहे, आपल्या परंपरेचा आहे. आपल्या श्रद्धेचा आहे, व्यवस्थेचा आहे. जनसंपर्काचा आहे, लोकशाहीचा आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि इंडोनेशिया हे सांस्कृतिक बंधनांनी बांधले गेले आहेत. आपले संबंध खूप जुने आहेत. परंतु आज आपल्या समोर हा देखील प्रश्न आहे की, हा विषय केवळ पुराणाचाच राहिला आहे का? आमच्या भावी पिढ्या, भविष्यातील उभय देशातील लोकांचा संपर्क आणखी कसा वाढेल, कसा मजबूत होईल, जिवंत राहील यावर देखील आपल्याला एकत्रितपणे काम करायला हवे. तुमच्यामध्ये असे बरेच लोक असतील जे कधीही भारतात आले नसतील. असे देखील अनेक लोकं असतील जे अनेक वर्ष मायदेशी आले नसतील. माझा आग्रह आहे की तुम्ही एकदातरी तुमच्या मित्रांसह भारतात नक्की या. भारतात कशाप्रकारे बदल घडत आहेत याचा तुम्ही अनुभव घ्याल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, इंडोनेशियाच्या नागरिकांना भारतात प्रवासासाठी 30 दिवसांचा मोफत व्हिसा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत एक मोठी संधी तुमची वाट पाहत आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागमध्ये कुंभ मेळाव्याचे आयोजन होणार आहे. श्रद्धेचा हा मेळावा तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव असेल. येथे तुम्हाला तुमच्या भारताच्या समृद्ध अध्यात्मिकतेच दर्शन तर होईलच पण त्याचबरोबर नव भारताची छबी देखील दिसेल. नव भारताच्या निर्मितीमधील संधींमध्ये सहभागी होण्याचे मी तुम्हाला आमंत्रण देतो. तुम्ही या आणि बदललेल्या वातावरणाचा लाभ देखील घ्या. तसेच त्यात आणखी बदल घडवून आणण्यासाठी योगदान देखील द्या.

तुम्ही मला येथे इतका मान दिलात, सन्मान दिलात यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आणि इंडोनेशियाच्या सरकारचे आणि इथल्या प्रशासनाचे मनपासून आभार मानतो.

तेरीमा कासिह कालियान तलह बर-अदा दी सिनी (येथे उपस्थित राहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद)

सलामत रमदान!

 

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 



(Release ID: 1534777) Visitor Counter : 166


Read this release in: English