मंत्रिमंडळ
पीएसएलव्ही मार्क-3 निरंतर कार्यक्रमाचा सहावा टप्पा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ; पीएसएलव्हीच्या 30 उड्डाणांसाठी निधी मंजूर
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2018 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएसएलव्ही मार्क- 3 म्हणजेच, पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल निरंतर कार्यक्रमाच्या सहाव्या टप्प्याला मजुरी देण्यात आली. त्याशिवाय, या अवकाश कार्यक्रमाअंतर्गत, पीएसएलव्हीच्या 30 उड्डाणांसाठी निधीही मंजूर करण्यात आला.
या कार्यक्रमाअंतर्गत, पृथ्वी निरीक्षण, दिशादर्शक आणि अवकाश विज्ञान यासाठी आवश्यक उपग्रह अवकाशात सोडले जातील. हे उपग्रह भारतातच तयार केले जातील.
या कार्यक्रमाअंतर्गत पीएसएलव्ही ची उड्डाणे, त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी, व्यवस्थापन आणि उड्डाण या सर्वांसाठी 6131 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या अवकाश अभियानामुळे, पृथ्वी निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन, दिशादर्शक आणि अवकाश विज्ञान अशा क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतेत वाढ झाली असून भारत स्वयंसिद्ध झाला आहे. सहाव्या टप्प्यातल्या कार्यक्रमामुळे ही स्वयंपूर्णता आणखी वाढेल.
या टप्प्यात, दरवर्षी 8 उपग्रह अवकाशात सोडले जातील, या उपग्रहांची जवळपास संपूर्ण निर्मिती भारतात तयार केली जाईल. सर्व 30 उड्डाणे 2019 -24 या कालावधीत पूर्ण केली जातील.
या कार्यक्रमाला 2008 सालीच मंजुरी देण्यात आली असून त्याचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. पाचवा टप्पा 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर सहावा टप्पा 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीपासून वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होईल.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1534662)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English