पंतप्रधान कार्यालय

देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी ‍व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

Posted On: 06 JUN 2018 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी ‍व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.

भारतातील युवा वर्ग रोजगार निर्माण करत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त करत केंद्र सरकार देशातील सर्व नागरीकांपर्यंत लाभ पोहोचवण्याप्रती वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्टार्ट अप क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पुरेसे भांडवल, धैर्य आणि माणसांना जोडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

‘स्टार्ट अप’चा अर्थ डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यता, असे मानले जात असे. मात्र, आता काळ बदलला आहे. विविध क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योजक आता नावारुपाला येत आहेत. 28 राज्ये, 6 केंद्र शासित प्रदेश आणि 419 जिल्ह्यांमध्ये स्टार्ट अपची व्याप्ती पसरली आहे. स्टार्ट अप इंडिया अंतर्गत संबंधित क्षेत्रातील स्थानिकांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्यामुळे 44 टक्के स्टार्ट अप हे Tier-2 आणि Tier-3 शहरांमध्ये नोंदविण्यात आले आहे. मुख्य म्हणजे 45 टक्के स्टार्ट अपची स्थापना महिलांनी केली आहे.

केंद्रातल्या सध्याच्या सरकारने पेटंट आणि ट्रेडमार्कसाठीची प्रक्रिया सुलभ केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ट्रेडमार्कसाठी पूर्वी 74 अर्ज भरावे लागत होते, आता ही संख्या 8 पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षात ट्रेडमार्क नोंदणीमध्ये तिपटीने वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत पेटंट नोंदणीच्या संख्येतही तिप्पट वाढ झाली आहे.

युवा उद्योजकांना स्टार्ट अपसाठी निधीची कमतरता भासू नये आणि नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या युवांना सुविधा उपलब्ध करुन देता याव्यात, यासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची निर्मिती केली आहे. या निधीच्या माध्यमातून 1285 कोटी रुपयांच्या वित्त पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले असून, 6980 कोटी रुपयांचा पत पुरवठा करण्यात आला आहे.

भारतातील स्टार्ट अप यंत्रणेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाय योजनांबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. स्टार्ट अप उद्योजकांना आपली उत्पादने सरकारला विकता यावी, यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस अर्थात GEM ला स्टार्ट अप इंडिया पोर्टलशी जोडण्यात आले आहे. स्टार्ट अप्सना तीन वर्षांसाठी आयकरातून सवलत देण्यात आली आहे. युवा उद्योजकांना केवळ स्वप्रमाणनाचा वापर करता यावा, यासाठी कामगारविषयक 6, तर पर्यावरणविषयक 3 कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. उद्योजकांना स्टार्ट अप आणि या यंत्रणेविषयी संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी स्टार्ट अप इंडिया हब हा डिजिटल मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

नाविन्याला चालना देण्यासाठी आणि युवा वर्गात स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने अटल न्यू इंडिया चॅलेंज, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि ॲग्रीकल्चर ग्रँड चॅलेंज अशा विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत. सिंगापूर आणि भारतामधील नवोन्मेषींमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सारखी स्पर्धा घेण्यासंदर्भात सिंगापूरच्या पंतप्रधानांशी आपण चर्चा केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतात नाविन्याला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला. युवकांना संशोधन आणि नाविन्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशभरात 8 रिसर्च पार्क आणि 2500 अटल टींकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत.

नवउद्योजकांना संबोधित करतांना कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवा वर्गांनी आपल्या संकल्पना घेऊन समोर यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. मेक इन इंडियाच्या बरोबरीने ‘डिझाइन इन इंडिया’ सुद्धा आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. युवकांनी नाविन्याचा ध्यास घेत रहावा, असे सांगत ‘Innovate or Stagnate’ असा मंत्र त्यांनी दिला.

पंतप्रधानांशी संवाद साधतांना नवोन्मेषींनी स्टार्ट अप सुरु करण्यासाठी सरकारी योजनांचा कशाप्रकारे लाभ झाला, याची माहिती या उपक्रमात सहभागी नवोन्मेंषींनी दिली. कृषी क्षेत्रातील नाविन्यापासून ब्लॉक चेन तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रात सुरु केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत उद्योजक आणि नवोन्मेषींनी पंतप्रधानांना माहिती दिली. अटल टिंकरिंग लॅबमध्ये शालेय विद्यार्थ्यांनींही आपल्या संशोधनांबद्दल पंतप्रधानांशी संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कौशल्यांचे कौतुक करत त्यांना अशाच प्रकारे आगेकूच करण्याचे प्रोत्साहन पंतप्रधानांनी दिले.

‘इनोव्हेट इंडिया’ ही लोक चळवळ व्हावी, अशी आवाहन पंतप्रधानांनी देशाला केले. #InnovateIndia या हॅशटॅगच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 



(Release ID: 1534632) Visitor Counter : 74


Read this release in: English