पंतप्रधान कार्यालय

नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला दिली पंतप्रधानांनी भेट

Posted On: 01 JUN 2018 5:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिली. विद्यार्थ्यांबरोबर साधलेल्या संवादात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

21 व्या शतकात आशियासमोरील आव्हाने या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की बरेचदा असे सांगण्यात आले आहे की 21वे शतक आशियाचे शतक असेल. आपण स्वत:वर विश्वास ठेवणे आणि आता ही माझी वेळ आहे हे समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगानुरूप आपण स्वत:ला सिद्ध करत नेतृत्व स्वीकारावे असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर अलिकडे झालेल्या भेटीचे उदाहरण दिले. या भेटीत राष्ट्रपती शी यांना आपण कागदपत्रे दिली, ज्यात असे आढळते की गेल्या दोन हजार वर्षांपैकी 1600 वर्षे जागतिक स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारत आणि चीनच्या संयुक्त वाटा 50 टक्क्यांहून अधिक राहिला आहे आणि कोणत्याही संघर्षाशिवाय हे साध्य झाले आहे असे ते म्हणाले. संघर्षाशिवाय संपर्क वाढवण्यावर आपण भर द्यायला हवा असे पंतप्रधान म्हणाले.

सुशासनात अंतराळ तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असे पंतप्रधान म्हणाले. सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता यात असल्याचे ते म्हणाले. आपल्या पायाभूत विकासाचे योग्य नियोजन करण्यात (शाळा, उत्तम रस्ते, रुग्णालये यांसारख्या) अंतराळ तंत्रज्ञान आपल्याला मदत करते, असे पंतप्रधान म्हणाले.

परंपरा आणि जागतिकीकरणातील समतोलाबाबत प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की नाविन्यपूर्ण संशोधन, नीतीमूल्य आणि मानवतावादी मूल्यांच्या माध्यमातून मानवाने प्रगती केल्याचे पंतप्रधान म्हणाले. मानवाच्या सर्जनशीलतेला तंत्रज्ञान सहाय्य करत असल्याचे ते म्हणाले. विविध समाज माध्यम मंचांनी लाखो व्यक्तींना आवाज दिल्याचे ते म्हणाले.

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, विस्कळीतपणा म्हणजे विनाश नव्हे. तंत्रज्ञान लोकांना सक्षम करते आणि तंत्रज्ञानाभिमुख समाज सामाजिक अडथळे पार करतो असे ते म्हणाले. तंत्रज्ञान परवडण्याजोगे आणि वापरायला सोपे असायला हवे असे ते म्हणाले. सुरुवातीला संगणकाबाबत लोक साशंक होते. मात्र संगणकांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात मदत केल्याचे ते म्हणाले

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1534097) Visitor Counter : 198


Read this release in: English