पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)

Posted On: 27 MAY 2018 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2018

 

नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. नाविका सागर परिक्रमा, हो.... मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले. संपूर्ण विश्वातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. गेल्या बुधवारी मला या सगळ्या सुकन्यांना भेटण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. मी पुन्हा एकदा या सुकन्यांचे त्यांच्या साहसासाठी, नौदलाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल, भारताचा गौरव वाढवल्याबद्दल आणि विशेषत: संपूर्ण विश्वाला भारतातल्या मुलीदेखील काही कमी कर्तृत्ववान नाहीत हा संदेश पोचवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. धाडसी वृत्ती, साहसी वृत्ती कोणाला ठाऊक नाही? आपण जर का मानव जातीच्या विकासाचा प्रवास पाहिला तर कोणत्या न कोणत्यातरी साहसाच्या गर्भातूनच प्रगतीचा जन्म झालेला आहे. साहसाच्या मांडीवरच तर विकास जन्म घेतो! काहीतरी करून दाखवण्याचा हा संकल्प, सर्वांच्या पेक्षा काहीतरी वेगळे करण्याची ही धारणा, आपणही काहीतरी असाधारण करून दाखवू शकतो ही गोष्ट, मी देखील काहीतरी करु शकतो ही भावना, असे करणारे हे लोक, संख्येने कमी का असेनात, पण युगानुयुगे, कोट्यवधी लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळत राहते.

गेल्या काही दिवसांत आपण पाहिले असेल की माऊंट एव्हरेस्टवर चढणाऱ्यांच्याविषयी अनेक नवनव्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. कित्येक वर्षांपासून एव्हरेस्ट मानवजातीला आव्हान देत राहिला आणि धाडसी  लोक हे आव्हान स्वीकारत राहिले.

16 मे रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील आदिवासी मुलांनी, आदिवासी विद्यार्थ्यांनी - मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कवीदास कातमोडे, विकास सोयाम या आपल्या आदिवासी मुलांच्या दलाने जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई केली. आश्रम शाळेतील या विद्यार्थ्यांनी ऑगस्ट 2017 मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. वर्धा, हैद्राबाद, दार्जिलिंग, लेह, लडाख - इथे ह्यांचे प्रशिक्षण झाले. या तरुणांना मिशन शौर्यच्या अंतर्गत निवडले गेले आणि नावाला साजेसा, एव्हरेस्टवर विजय मिळवून त्यांनी संपूर्ण देशाला गौरवान्वित केले. मी चंद्रपूरच्या शाळेतील ह्या लोकांचे, माझ्या छोट्या छोट्या साथीदारांचेखूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. अशातच सोळा वर्षांची शिवांगी पाठक, नेपाळच्या बाजूने एव्हरेस्टवर चढाई करणारी, सर्वात कमी वयाची भारतीय महिला ठरली. बेटी शिवांगीचे पण खूप खूप अभिनंदन.

अजित बजाज आणि त्यांची मुलगी दिया, एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली भारतीय वडील-लेकीची जोडी ठरली आहे. असे नाही की केवळ तरुणच एव्हरेस्टवर चढाई करत आहेत. संगीता बहल यांनी 19 मे रोजी एव्हरेस्टवर चढाई केली आणि संगीता बहल यांचे वय 50 हून अधिक आहे. माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारे काहीजण असेही आहेत की ज्यांनी दाखवून दिले, कि त्यांच्याकडे केवळ कौशल्यच नाही तर ते संवदेनशील पण आहेत. काही दिवसांपूर्वी स्वच्छ गंगा अभियानाच्या अंतर्गत BSFच्या एका ग्रुपने माउंट एव्हरेस्टवर चढाई केली आणि संपूर्ण टीम आपल्याबरोबर एव्हरेस्टवरचा बराचसा कचरा घेऊन खाली उतरली. हे कार्य प्रशंसनीय तर आहेच पण त्याबरोबरच स्वच्छतेच्या प्रति, पर्यावरणाच्या प्रति असलेली त्यांची बांधिलकी देखील दर्शवत आहे. अनेक वर्षांपासून लोक एव्हरेस्टवर चढाई करत आहेत आणि  कितीतरी लोक असेही आहेत की ज्यांची ही चढाई यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या सर्व यशस्वी वीरांचे खास करून मुलींचे मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो आणि खास करून माझ्या तरुण मित्रांनो ! आत्ता दोन महिन्यांपूर्वी जेव्हा मी ‘Fit India’चा विषय मांडला होता तेव्हा मला वाटले नव्हते की इतका चांगला प्रतिसाद मिळेल, इतक्या मोठ्या संख्येने, प्रत्येक क्षेत्रातील लोक, ह्याला पाठिंबा देतील. जेव्हा मी Fit India च्या विषयी बोलतो तेव्हा असे मानतो कि जेवढे आपण खेळू तेवढा देश खेळेल. Social media वर लोक fitness challenge चे व्हिडीओज्‌ शेअर करत आहेत. त्यात इतरांना टॅग करून त्यांना चॅलेंज करीत आहेत.

फिट इंडियाच्या या अभियानाशी आज प्रत्येक जण जोडला जात आहे. मग ते चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक असतील, क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोक असतील, सर्वसाधारण लोक असतील, सेनेतील जवान असतील, शाळेतील शिक्षक असतील, चहूबाजूंनी एकच प्रतिध्वनी ऐकू येतो आहे ‘हम फिट तो इंडिया फिट’! माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की मलाही भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहलीजी यांनी चॅलेंज केले आहे आणि मी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. मी अस मानतो की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे आव्हान आम्हाला तंदुरुस्त राहायला आणि दुसऱ्यांनाही तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मन कि बात मध्ये कित्येक वेळा खेळासंबंधी, खेळाडूंच्या संबंधी काही ना काही गोष्टी आपण माझ्याकडून ऐकल्याच आहेत आणि गेल्या वेळी तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आपले   नायक आपली मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सांगत होते .

नमस्कार सर! मी नोएडा येथून छवी यादव बोलते आहे. मी आपल्या मन की बात’ची नियमित श्रोता आहे आणि आज आपल्याशी माझी मन की बात करू इच्छिते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि एक आई म्हणून मी पाहते आहे कि आता मुले आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवरचे खेळ खेळण्यात घालवतात. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पारंपरिक खेळ, जे जास्त करून मैदानी असायचे ते खेळत असू. जसा एक खेळ असायचा ज्यात सात दगडाचे तुकडे एकावर एक रचून त्याला चेंडूने मारायचो, तसेच सी-सॉ वर-खाली करण्याचा खेळ होता, खोखो होता. हे सगळे खेळ आज हरवून गेले आहेत. माझी विनंती आहे की आपण आजच्या पिढीला ह्या पारंपरिक खेळांविषयी काही सांगावे ज्यामुळे त्यांनाही ते खेळ आवडायला लागतील. धन्यवाद!

छवी यादवजी, आपल्या फोन कॉलसाठी खूप आभार. ही गोष्ट तर खरी आहे की जे खेळ  कधी काळी गल्लोगल्ली प्रत्येक मुलाच्या आयुष्याचा हिस्सा असायचे ते आता कमी होत चाललेले आहेत.  हे खेळ खास करून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा विशेष भाग असायचे. कधी भर दुपारी तर कधी रात्रीच्या जेवणानंतर कसलीही चिंता न करता, अगदी बेपर्वा होऊन मुले तासन्‌तास खेळत असायची आणि काही  खेळ तर असे होते की संपूर्ण परिवार सोबत खेळत असायचा. लगोरी असेल, गोट्या असतील, खोखो असेल, भोवरा असेल, विटीदांडू असेल असे कितीतरी … अगणित खेळ काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कच्छपासून कामरूप पर्यंत प्रत्येकाच्या बालपणाचा भाग असायचे. हं, आता असं होऊ शकते की वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असतील. जसे आता पिठ्ठू हा खेळ अनेक नावांनी ओळखला जातो. कोणी त्याला लगोरी, सातोलिया, सात पत्थर, डिकोरी, सतोदिया.. काय माहिती… एकाच खेळाची किती नावे! परंपरागत खेळात दोन्ही प्रकारचे खेळ आहेत. मैदानी खेळ पण आहेत आणि घरात खेळायचे खेळ पण आहेत. आपल्या देशातील विविधतेच्या पाठीमागे दडलेली एकता ह्या खेळात देखील पाहायला मिळते. एकच खेळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. मी गुजरातचा आहे. मला माहिती आहे की गुजरातमध्ये एक खेळ खेळला जातो ज्याला चोमल इस्तो म्हणतात. हा कवड्यांनी, चिंचोक्यांनी  किंवा फाश्याने 64 घरांच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. हा खेळ जवळपास प्रत्येक राज्यात खेळला जातो. कर्नाटकात याला चौकाबारा म्हणतात तर मध्यप्रदेशात अत्तु. केरळमध्ये पकीडाकाली तर महाराष्ट्रात चंपल. तामिळनाडूत दायाम आणि थायाम तर राजस्थानमध्ये चंगापो, कोण जाणे किती नावे होती. पण खेळल्यावर लक्षात यायचे, जरी प्रत्येक राज्यातील भाषा येत नसेल तरी, अरे वा! हा खेळ तर आम्हीही खेळतो ! आपल्यातील असे कोण असेल ज्याने लहानपणी विटीदांडू खेळला नसेल. विटीदांडू तर गावापासून ते शहरापर्यंत खेळला जाणारा खेळ आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. आंध्रप्रदेशात त्याला गोटीबिल्ला किंवा कर्राबिल्ला म्हणतात. ओरिसामध्ये गुलिबाडी म्हणतात तर महाराष्ट्रात विटी-दांडू म्हणतात. काही खेळांचा  आपला एक हंगाम असतो. जसे पतंग उडवायचा पण एक काळ असतो. तेव्हा प्रत्येक जण पतंग उडवतो. जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा आमच्यात असणारे विशेष नैपुण्य जे आम्ही मोकळेपणाने व्यक्त करु शकतो. आपण पाहिले  असेल की अनेक मुले जी लाजाळू असतात ती खेळताना मात्र एकदम चंचल होऊन जातात. स्वतःला व्यक्त करतात.  मोठे  जे गंभीर वाटतात, खेळताना  त्यांच्यात लपलेले  लहान मूल बाहेर येते. पारंपरिक खेळ अशा तऱ्हेने बनवलेले आहेत की शारीरिक क्षमतेबरोबरच ते आपल्यातील सारासार विचारशक्ती, एकाग्रता, सजगता, स्फूर्ती पण वाढवतात आणि खेळ फक्त खेळच नसतात तर जीवनातील मूल्ये देखील ते शिकवतात. ध्येय कसे निश्चित करायचे, चिकाटी कशी मिळवायची, संघ भावना कशी उत्पन्न करायची, एकमेकांना मदत कशी करायची. काही दिवसांपासून मी पाहतो आहे की buisiness management च्या प्रशिक्षण कार्यक्रमात देखील संपूर्ण व्यक्तीमत्व विकास आणि व्यक्ती व्यक्तीमधील कौशल्य विकासासाठी आजकाल आपल्या परंपरागत खेळांचा वापर होतो आहे आणि अगदी सहजपणे संपूर्ण विकासासाठी आमच्या खेळांचा उपयोग होतो आहे आणि तसेही हे खेळ खेळण्याचे काही वय तर नसतेच. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळेजण जेव्हा खेळतात ना, तेव्हा जे काय म्हणतात ना, पिढीतील अंतर, ते देखील गायब होऊन जाते. त्याचबरोबर आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरासुद्धा समजतात.  कितीतरी खेळ आपल्याला आपला समाज आणि पर्यावरण ह्याचे भान आणून देतात. कधी कधी  काळजी वाटते की आपले हे खेळ हरवून तर जाणार नाहीत ना? आणि मग नुसते हे खेळ हरवणार नाहीत तर बालपणच हरवून जाईल आणि मग आपण त्या कविता ऐकत राहू ,

    यह दौलत भी ले लो

     यह शौहरत  भी ले लो

     भले छिन लो मुझसे मेरी जवानी

      मगर मुझको लौटा दो बचपन का सावन

      वो कागज की कश्ती वो बारिश का पानी

असे आपण फक्त हे गाणे ऐकत राहू, म्हणूनच हे पारंपारिक खेळ हरवू द्यायचे नाहीत. आज आवश्यकता आहे ती शाळा, वस्ती, युवक मंडळ यांनी पुढे येऊन ह्या खेळाला उत्तेजन देण्याची. समूह एकत्र करुन आपण हे पारंपारिक खेळ जतन करु शकतो. या खेळांचे व्हिडिओज बनवता येतील ज्यामध्ये ह्या खेळांचे नियम, खेळण्याची पद्धत याविषयी दाखवता येईल. Animation फिल्मस अर्थात सचेतपट सुध्दा बनवता येऊ शकतील ज्यामुळे आपली नवी पिढी, ज्यांच्यासाठी हे गल्लीमध्ये खेळले जाणारे खेळ म्हणजे एक नवल आहे, ती बघेल, खेळेल आणि विकसित होईल. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो ! येणाऱ्या 5 जूनला आपला भारत देशाला अधिकृतरीत्या (world environment day) जागतिक विश्व पर्यावरण दिवसाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. हा भारतासाठी मोठा बहूमान आहे. वाढत तापमान कमी करण्याच्या दिशेने जगभरातून भारतीय नेतृत्वाला मान्यता मिळते आहे याचे हे लक्षण आहे. या वेळची संकल्पना आहे ‘Beat plastic pollution’ ‘प्लास्टिक प्रदूषण रोखा’. माझे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे कि या संकल्पनेमागची भावना, महत्त्व समजून घेऊन, आपण सगळे ठरवू या की आम्ही पॉलिथिन low grade plastic वापरणार नाही आणि प्लास्टिक प्रदूषणाचा जो एक विपरीत परिणाम आपल्या  निसर्गावर, वन्यजीवांवर आणि आपल्या आरोग्यावर पडत आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू. जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर ‘wed-india 2018’ वर जा. तिथे अनेक सूचना अगदी आकर्षकरीत्या दिलेल्या आहेत. त्या बघा, जाणून घ्या आणि आपल्या रोजच्या जीवनात त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा खूप उन्हाळा असतो, पूर येतो, पाऊस थांबत नाही, असह्य थंडी पडते तेव्हा प्रत्येक जणच तज्ज्ञ बनून जागतिक तापमान वाढीबद्दल पर्यावरणातील बदलाविषयी गप्पा  मारतो पण केवळ गप्पा मारून काही साध्य होणार आहे का ? निसर्गाच्या प्रति संवेदनशील असणे, निसर्गाचे रक्षण करणे ही आपली सवय व्हायला हवी. ते आपल्या संस्कारात आले पाहिजे. गेल्या काही आठवड्यात आपण पाहिले की देशातल्या वेगवेगळ्या भागात धुळीचे वादळ आले. जोरदार वाऱ्यासह पाऊस आला जो बेमोसमी होता. प्राणहानीदेखील झाली आणि वित्तहानी पण झाली. या सगळ्या गोष्टी मुळात हवामानाच्या संरचनेत जो बदल झालेला आहे त्याचे परिणाम आहेत. आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने आम्हाला निसर्गाशी संघर्ष करायला शिकवलेले नाही. आम्हाला निसर्गासोबत सद्भावनेने राहायचे आहे. निसर्गाशी मिळून-मिसळून राहायचे आहे. महात्मा गांधींनी तर आयुष्यभर, पावलोपावली ह्याच गोष्टीचा पुरस्कार केला. जेव्हा आज भारत climate Justice विषयी बोलतो, जेव्हा भारताने Cop 21 आणि Paris करारात प्रमुख भूमिका निभावली, जेव्हा आम्ही inernational solar alliance च्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र आणले तेव्हा तेव्हा त्याच्या मुळाशी, महात्मा गांधींचे ते स्वप्न पूर्ण करण्याची भावना होती. ह्या पर्यावरण दिनी आपल्याला सगळ्यांना विचार करायचा आहे की आपल्या पृथ्वीला स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी आपण काय करू शकतो? कशा प्रकारे या  दिशेने पुढे जाऊ शकतो? काय नवीन करू शकतो? पावसाळा येतो आहे यावेळी आपण विक्रमी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवू शकतो. केवळ वृक्षारोपणच नाही तर ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था करणे देखील  आपले कर्तव्य आहे. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो  आणि विशेष करून माझ्या तरुण साथीदारांनो ! 21 जून आता आपल्या पक्का लक्षात असतो. केवळ तुम्ही आम्हीच नाही संपूर्ण जग 21 जून लक्षात ठेवते. संपूर्ण विश्वात  21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या रूपाने साजरा केला जातो, हे सगळ्यांनी आता स्वीकारले आहे आणि कित्येक महिने आधीपासून लोक तयारी सुरु करतात. आजकाल बातम्या मिळत आहेत की जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. Yoga For Unity आणि harmonious society चा हा तो संदेश आहे, जो जगाने गेल्या काही वर्षात वारंवार अनुभवला. महान  संस्कृत कवी भर्तृहरी यांनी अनेक शतकांपूर्वी आपल्या शतकत्रयम मध्ये लिहिले होते -

धैर्य यस्य पिता क्षमा च जननी शान्तिश्चिरं गेहिनी

सत्यं सुनूरयं  दया च भगिनी भ्राता मनः संयमः।

शय्या भूमितलं दिशोSपि वसनं ज्ञानामृतं भोजनं

एते यस्य कुटिम्बिन: वद सखे कस्माद् भयं योगिनः।।

शतकांपूर्वी सांगितल्या गेलेल्या या गोष्टीचा सरळ साधा अर्थ आहे की नियमित योगाभ्यासामुळे चांगले गुण नातेवाईक आणि मित्रांप्रमाणे होऊन जातात. योगाभ्यासाने साहस उत्पन्न होते जे नेहमीच पित्याप्रमाणे आमचे रक्षण करते. जसा आईला आपल्या मुलांविषयी असतो तसा क्षमाभाव उत्पन्न होतो आणि मानसिक शांतीशी कायमची मैत्री होऊन जाते. भर्तृहरी यांनी सांगितले आहे की नियमित योगाभ्यासाने सत्य आमचे मुल, दया आमची बहीण, आत्मसंयम आमचा भाऊधरती आमचे अंथरूण आणि ज्ञान आमची भूक भागवणारे बनून जाते. इतके सगळे गुण ज्याचे मित्र बनतात तो योगी सर्व प्रकारच्या भयावर विजय मिळवतो. मी पुन्हा एकदा सगळ्या देशवासीयांना आवाहन करतो की योगाचा आपला वारसा पुढे नेऊया आणि एक आरोग्यशाली, आनंदी, सद्‌भावपूर्ण राष्ट्र निर्माण करूया.

माझ्या प्रिय देशवासीयांनो ! आज 27 मे आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांची पुण्यतिथी आहे. मी पंडितजींना प्रणाम करतो. या मे महिन्याची आठवण आणखी एका गोष्टीशी जोडली गेलेली आहे ती म्हणजे वीर सावरकर. 1857 मध्ये मे’चाच महिना होता जेव्हा भारतवासीयांनी इंग्रजांना आपली ताकद दाखवली होती. देशातल्या कितीतरी भागात आमचे जवान  आणि किसान आपले शौर्य दाखवत अन्यायाच्या विरोधात उभे ठाकले होते. दुःखाची गोष्ट ही कि दीर्घकाळ आम्ही 1857च्या घटनेला केवळ बंड किंवा शिपायांचे बंड म्हणत राहिलो. खरोखर त्या घटनेचे केवळ अवमूल्यनच  केले गेले असे नाही तर हा आमच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचासुद्धा हा प्रयत्न होता. ते वीर सावरकरच होते ज्यांनी निर्भिडपणे लिहिले की 1857 मध्ये जे झाले ते बंड नव्हते तर पहिला स्वातंत्र्यसंग्रामच होता. सावरकरांसह लंडनच्या इंडिया हाऊस मधील वीरांनी या स्वातंत्र्यसंग्रामाचा पन्नासावा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा केला. हा देखील एक अदभूत योगायोग आहे की ज्या महिन्यात पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचा प्रारंभ झाला त्याच महिन्यात वीर सावरकरजी यांचा जन्म झाला. सावरकरजींचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्यपूर्ण होते. शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचे ते उपासक होते. सामान्यतः वीर सावरकर त्यांचे शौर्य आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष यासाठी ओळखले जातात आणि या   सगळ्याखेरीज ते एक ओजस्वी कवी आणि समाज सुधारक देखील होते. त्यांनी नेहमीच सद्‌भावना आणि एकतेचा आग्रह धरला. सावरकरजींविषयी एक अदभूत वर्णन आपले प्रिय आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजी यांनी केले आहे. ते म्हणाले होते....... सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तपसावरकर म्हणजे तत्त्वसावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तलवार. किती अचूक वर्णन केलं होते अटलजींनी. सावरकर क्रांती आणि कविता दोन्ही सोबत घेऊन चालत होते. संवेदनशील कवी होण्याबरोबरच ते शूर क्रांतिकारक देखील होते.

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो!  मी टीव्हीवर एक गोष्ट पहात होतो. राजस्थानच्या सीकर मधील झोपडीत राहणाऱ्या आपल्या गरीब मुलींची. आपल्या या मुली, ज्यांना कधी कचरा वेचण्यापासून ते घरोघर जाऊन हात पसरावा लागत होता, त्या आज शिवणकाम शिकून गरिबांचे शरीर झाकण्यासाठी कपडे शिवत आहेत. येथील मुली, आज आपले व आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या कपड्यांबरोबर, साधे कपडे आणि सणासमारंभात घालण्यायोग्य कपडे  शिवत आहेत. याबरोबरच त्या कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम देखील करीत आहेत. आपल्या ह्या मुली आज स्वयंपूर्ण बनल्या आहेत. सन्मानाने आपले जीवन जगत आहेत आणि आपापल्या परिवारासाठी एक ताकद बनलेल्या आहेत. आशावादी आणि विश्वासपूर्ण अशा या आमच्या मुलींना मी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी दाखवून दिले आहे की काही करून दाखवण्याचा निश्चय असेल आणि हा निश्चय कृतीत आणण्याचा संकल्प असेल, तर अनेक अडचणी असून देखील यश मिळवता येते आणि ही फक्त सीकरची गोष्ट नाही तर हिंदुस्थानमधील कानाकोपऱ्यात आपल्याला हे बघायला मिळते. आपल्या आजूबाजूला, शेजारीपाजारी नजर टाकाल तर लक्षात येईल लोक कशाप्रकारे समस्यांवर मात करीत आहेत. आपल्याला लक्षात आले असेल की जेव्हा आपण एखाद्या चहाच्या दुकानावर जातो तेव्हा चहाचा आनंद तर घेतोच पण सोबतच  लोकांशी चर्चा आणि विचार विनिमय पण करतो. त्या चर्चा राजकीय असतात, सामाजिक असतात, सिनेमाच्या असतात, खेळ आणि खेळाडूंच्या असतात, देशापुढील समस्यांच्या असतात की अशी समस्या आहे त्यावर कशी मात करता येईल, असे करायला पाहिजे पण खूपदा या चर्चा निव्वळ चर्चाच राहतात. मात्र काही लोक असे असतात जे आपल्या कार्याने, मेहनत आणि निष्ठेने, बदल घडवून आणण्याच्या दिशेने पुढे जातात.  त्याला वास्तवाचे रुप देतात.  दुसऱ्यांच्या स्वप्नांना आपले मानून ते पूर्ण करण्यासाठी स्वत:चे आयुष्य खर्च करण्याची काहीशी अशीच गोष्ट आहे, ओरिसातील कटक शहरातील झोपडीत राहणाऱ्या डी प्रकाश राव यांची. कालच मला डी प्रकाश राव यांना भेटण्याचे भाग्य लाभले. श्रीमान डी प्रकाश राव गेल्या पाच दशकांपासून शहरात चहा विकत आहेत. एक साधारण चहाविक्रेता, तुम्हाला कळले तर आश्चर्य वाटेल, पण 70 हून जास्त मुलांच्या आयुष्यात ते शिक्षणाचा प्रकाश पसरवत आहे. गरीब वस्ती आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी आशा आश्वासन नावाची शाळा उघडली आहे. हा गरीब चहावाला आपल्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम त्यातच खर्च करून टाकतो. ते  शाळेत येणाऱ्या सगळ्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था करतात. मी डी प्रकाश राव यांचे कठोर परिश्रम, त्यांची निष्ठा आणि त्या गरीब मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अंधार संपवून टाकला आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे वेदवाक्य कोणाला माहित नसते? पण ते प्रत्यक्ष जगून दाखवले आहे डी प्रकाश राव यांनी. त्यांचे जीवन आपल्या सगळ्यांसाठी, समाजासाठी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी  आहे. आपल्याही आजूबाजूला अशा प्रेरक घटनांची मालिका असेल. अगणित घटना  असतील. या, आपण अशीच सकारात्मकता पुढे नेऊया.

जून महिन्यात एवढा तीव्र उन्हाळा जाणवतो कि लोक पावसाची वाट पहात राहतात आणि ह्याच आशेने आकाशातील ढगांकडे एकटक पहात राहतात. काही दिवसांनंतर लोक चंद्राची पण वाट पाहतील. चंद्र दिसला ह्याचा अर्थ आहे की ईद साजरी केली जाऊ शकते. रमजानच्या दरम्यान, एक महिन्याच्या उपासा नंतर, ईदचे पर्व ही उत्सवाची सुरुवात आहे. मला विश्वास आहे कि सर्व लोक ईद खूप उत्साहाने साजरी करतील. ह्यानिमित्ताने मुलांना विशेष करून चांगली ईदीदेखील मिळेल. आशा करतो की ईदचा सण आमच्या समाजातील सद्‌भावनेचे बंध आणखी मजबूत करेल. सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

माझ्या प्रिय देशवासीयांनो! आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये भेटूया!

नमस्कार!!

 

 

 

N.Sapre/AIR/D.Rane



(Release ID: 1533603) Visitor Counter : 275


Read this release in: English