पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची शांती निकेतनला भेट, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती, बांगलादेश भवनाचे उद्‌घाटन

Posted On: 25 MAY 2018 3:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली.  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहून आगंतूक पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.

भारतातील लोकशाही ही प्रशासनातील उत्तम शिक्षकाप्रमाणे असून ती देशातील 125 कोटी नागरिकांना प्रेरणा देते असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीवर विद्वजनांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहणे हे सौभाग्याचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

आज पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या विद्यापीठात शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पदवीच मिळालेली नाही तर एक समृद्ध वारसाही लाभला आहे, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण विश्व हे एका घरासारखे असल्याची शिकवण वेदांमधून मिळते आणि हीच मूल्य विश्व भारती विद्यापीठाच्या संस्कारांमधून दिसून येतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे स्वागत करत भारत आणि बांगलादेश हे दोन देश स्वतंत्र असले तरी परस्पर सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून ते परस्पांशी जोडलेले आहेत, असे ते म्हणाले.

गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दल जगभरात आदराची भावना आहे असे सांगत 3 वर्षांपूर्वी ताजीकिस्तानमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी आपल्याला लाभली होती, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आजघडीला जगभरात टागोर हा अभ्यासाचा विषय असू शकतो असे सांगत गुरुदेव हे जागतिक नागरिक होते, असे गौरवोदृ्गार त्यांनी काढले.

भारतीय विद्यार्थ्यांनी आपले भारतीयत्व जपत जगभरातील विकासकामांमध्ये बरोबरीने सहभागी झाले पाहिजे असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना वाटत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या परिसरातील गावांमध्ये कौशल्य विकास आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विश्व भारती विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले. 2021 साली विद्यापीठ शकतपूर्ती साजरी करणार असून विद्यापीठाने 100 गावांपर्यंत आपली व्याप्ती वाढवावी अशी अपेक्षा पंतप्रधनांनी व्यक्त केली. या 100 गावांच्या समग्र विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

2022 सालापर्यात नव भारताची निर्मिती करण्यात विश्व भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने योजलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

बांगलादेश भवन हे भारत आणि बांगला देशमधील सांस्कृतिक भावबंधाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी बांगलादेश भवनाच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.

या विद्यापीठाने आणि या भूमीने भारत आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे. दोन्ही देशांसाठी हे वारशाचे प्रतीक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

बांगलादेशचे शेख मुजीबूर रहेमान यांच्याबद्दल भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आदराची समान भावना आहे. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांना भारताइतके बांगलादेशमध्येसुद्धा मानले जाते, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचप्रमाणे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची शिकवण बांगलादेश आणि भारतासाठीही तशीच महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक मानवतेसंदर्भातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची शिकवण केंद्र सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमात प्रतिबिंबीत झाल्याचे दिसते, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि बांगलादेशचा क्रौर्य आणि दहशतवादाविरोधातील लढा यापुढेही कायम राहील, आणि बांगलादेश भवनाच्या माध्यमातनू भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल, असे ते म्हणाले. गेल्यावर्षी नवी दिल्लीमध्ये बांगलादेशने भारतीय जवानांचा सत्कार केला होता, त्या आठवणींनाही पंतप्रधानांनी उजाळा दिला.

दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने गेल्या 4 वर्षांचा हा सुवर्णकाळ होता, असे पंतप्रधानांनी सांगितले. भू सीमा मुद्दा तसेच विविध जोडणी प्रकल्पांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

दोन्ही देशांची लक्ष्ये समान असून ती साध्य करण्यासाठी दोन्ही देश एकाच मार्गावर चालत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

N.Sapre/M.Pange/P.Kor



(Release ID: 1533495) Visitor Counter : 92


Read this release in: English