अर्थ मंत्रालय
लघु उद्योगांना चालना देण्यासाठी कर्जदाते, उद्योग आणि मुद्रा बँक यांच्या त्रिस्तरीय भागिदारीवर शिक्कामोर्तब
Posted On:
23 MAY 2018 6:17PM by PIB Mumbai
मुंबई, 23 मे 2018
लघु उद्योग कर्जांसाठी कर्जदाते, उद्योग आणि मुद्रा बँक मर्यादित यांनी आज मुंबईत त्रिस्तरीय भागिदारीवर शिक्कामोर्तब केले. वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या पुढाकाराने ही प्रक्रिया मार्गी लागली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या अद्भुत यशाच्या पायावर हा उपक्रमही यशस्वी होईल, असा विश्वास वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी व्यक्त केला. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकता निर्मिती’ या विषयी आज मुंबईत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
या वर्षी ओयो, ओला, उबेर, अमेझॉन, फ्लीपकार्ट, मेरू, कारझोनरेंट, यात्रा, मेक माय ट्रीप बरोबरच स्वीग्गी, झोमॅटो, ग्रॅब, डिल्हीवरी, एक्सप्रेसबी, लोडशेअर तसेच अमूल, पतंजली असे खाद्य क्षेत्रातील उद्योग, लावा मोबाइल, जावेद हबीब सारख्या व्यावसायिक शाखांचा विस्तार, इंडीयन ऑईल, बीपीसीएल सारख्या तेल कंपन्या, बीग बास्केट आणि मुंबईच्या डबेवाल्यांबरोबरच केबल ऑपरेटर्सनाही मुद्रा योजने अंतर्गत आवश्यकतेनुसार कर्ज प्रदान करण्यावर भर दिला जाणार आहे.
विविध सेवा क्षेत्रातील या कंपन्यांना, उपक्रमांना आपापल्या सेवांच्या विस्तारासाठी नव्या सदस्यांची आवश्यकता भासत असते. ही गरज भागविण्याच्या कानी मुद्रा योजना सहायक ठरू शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांबरोबरच हिंदूजा लेलंड फायनांन्स, हिरो फिनकॉर्प, श्रीराम फायनान्स, मुथ्थुट फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स, बजाज फायनान्स अशा कंपन्याही मुद्रा योजनेच्या व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत.
अल्प दरात अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अशा योजनांचा लाभही सर्वदूर पोहोचत आहे. केवळ 342 रुपये भरुन एका व्यक्तीला 4 लाख रुपयांचे विमा कवच प्राप्त होते. या योजनांचा लाभ वाहन चालक, डिलिवरी बॉईज् अशा निम्न स्तरातील कामगारांनाही मिळावा यासाठी उद्योग क्षेत्रातही प्रयत्न होत आहेत.
उद्योग क्षेत्रातील सर्वच भागधारकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. या उपक्रमामुळे विविध उद्योजक आणि रोजगार निर्मात्यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
B.Gokhale/M.Pange/D.Rane
(Release ID: 1533211)
Visitor Counter : 107