रेल्वे मंत्रालय

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक इमारतीला 130 वर्षे पूर्ण

Posted On: 21 MAY 2018 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2018

 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक इमारतीला 20 मे 2018 रोजी 130 वर्षे पूर्ण झाली. मध्य रेल्वेचे मुख्यालय असणारी व्हिक्‍टोरिया टर्मिनस अर्थात आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारत म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जाते. फेड्रीक विल्यम्स स्टीव्हन्स या वास्तुरचनाकाराने या इमारतीची रचना केली होती. 1878 साली इमारतीच्या कामाला सुरुवात झाली होती आणि 1887 साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 10 वर्षांचा अवधी लागला होता, तर 16 लाख 13 हजार 863 रुपये खर्च झाला होता.

भारतात ताजमहाल खालोखाल या वास्तुची सर्वाधिक छायाचित्रे काढली जातात. ब्रिटनची तत्कालीन राणी व्हिक्टोरिया हिचे नाव या वास्तुला देण्यात आले. 1996 साली छत्रपती शिवाजी टर्मिनस तर जुलै 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे या इमारतीचे नामांतर करण्यात आले. वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या इमारतीचा समावेश केला आहे. डिसेंबर 2012 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी इच्छुकांना ही इमारत पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

इमारतीला 100 वर्षे पूर्ण झाली असता, टपाल खात्याने एक विशेष टपाल तिकीट जारी केले.  तर, 2013 साली इमारतीला 125 वर्षे पूर्ण झाली असता, एक विशेष पोस्टल कव्हर जारी करण्यात आले.

 

 

 

 

N.Sapre/M.Pange/D.Rane

 


(Release ID: 1532963) अभ्यागत कक्ष : 141
Read this releasein: English