सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

महाराष्ट्रात 675 शिबीरांतून 87,000 दिव्यांगांना 51.51 कोटी रुपयांची कल्याणकारी उपकरणं वितरित- थावरचंद गेहलोत

दिव्यांगजनांसाठीचे आरक्षण 4 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे गेहलोत यांचे राज्य सरकारांना आवाहन

Posted On: 19 MAY 2018 4:19PM by PIB Mumbai

पुणे, 19 मे 2018

 

समाजातल्या शोषितांच्या उत्थानासाठी काम करुन त्यांच्यासाठी विकासाच्या संधी खुल्या करणे ही आपली जबाबदारी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी म्हटले आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या असिस्टन्स टू डिसेबल पर्सन फॉर पर्चेस/ फिटिंग ऑफ एड्स अँड ॲप्लायन्सेस अर्थात  एडीप योजनेअंतर्गत पुण्यात आज दिव्यांगजनांसाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या उपकरणांचे वितरण गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  शोषित आणि गरजूंची काळजी घेण्याची दीर्घ परंपरा भारताला लाभली आहे. मात्र गरीबांप्रती औदासिन्य बाळगण्याचा कल गेल्या काही दशकांत दिसत असल्याचे ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम्‌ ही भारताची परंपरा आहे असे ते म्हणाले.

 

   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. दिव्यांगजनांसाठी सहाय्यकारी उपकरणांचे वाटप ही यापैकीचं योजना असल्याचे ते म्हणाले.

वयोश्री योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या सहाय्यक उपकरणांमुळे दारिद्रय रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना वयामुळे आलेल्या शारिरिक व्याधींवर मात करण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला. तीन वर्षात 5.2 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.  वयोश्री योजनेअंतर्गत वृद्धांना साडे सात हजार रुपयांपर्यंतची उपकरणं मोफत उपलब्ध करुन दिली जातात असे त्यांनी सांगितले.

देशभरात 6,842 कॅम्प आयोजित करण्यात आले असून 10.55 लाख लोकांना याद्वारे 500 कोटी रुपयांच्या सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात 675 कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्याद्वारे 87,000 लाभार्थींना 51.51 कोटी रुपयांच्या कल्याणकारी साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

सुगम्‍य भारत योजनेअंतर्गत सार्वजनिक स्थानं दिव्यांगांसाठी सोयीची ठरावीत अशा रितीने त्यांचा विकास करण्यात येत आहे. महाराष्ट्रात 180 इमारती निश्चित करण्यात आल्या असून यापैकी 142 इमारतींमध्ये लिफ्ट, स्वच्छता गृहे, रेलिंग यासारखी कामे सुरु करण्यात आल्याचे गेहलोत म्हणाले.  

मोफत कॉक्लीअर इम्प्लांटचा 1,212 मुलांना लाभ झाला आहे. यापैकी बहुतांश मुलांना आता उत्तम बोलता येऊ लागले आहे असेही त्यांनी नमूद केले.

पूर्णत: अंध असलेल्या दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून अशा व्यक्तींसाठी विशेष वॉकर संदर्भात त्यांनी माहिती दिली. या वॉकरमध्ये बसवलेल्या संवेदकामुळे अडथळ्याजवळ आल्यास त्याचा संदेश अंध व्यक्तीपर्यंत पोहोचतो असे त्यांनी सांगितले.

सरकारी नोकरीमध्ये दिव्यांगजनांसाठी 4 टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने केला असून राज्य सरकारांनीही दिव्यांगांसाठीचे आरक्षण 4 टक्क्यांपर्यंत वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.

पुण्यातल्या चार वेगवेगळ्या ठिकाणच्या 1,152 लाभार्थींना सुमारे 89,56,000 रुपयांची ट्रायसिकल फोल्डिंग व्हिलचेअर, कुबड्या, वॉकिंग स्टीक, श्रवण यंत्र, कॅलीपर्स यासारख्या दिव्यांगजनांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या 1,758 उपकरणांचे वितरण करण्यात आले.

प्रत्येक लाभार्थीचे नांव, छायाचित्र आणि संपर्कासह संबंधित माहिती संकेतस्थळावर पाहता येते असे सांगून या शिबीरातल्या पारदर्शकतेची ग्वाही मंत्र्यांनी दिली.  

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1532831) Visitor Counter : 105


Read this release in: English