पंतप्रधान कार्यालय

नेपाळ भेटीदरम्यान पंतप्रधानानी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 11 MAY 2018 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2018

 

महामहीम,माननीय,पंतप्रधान,

के पी शर्मा ओलीजी,

विशेष अतिथीगण,

प्रसार माध्यमांतले उपस्थित मित्र,

नमस्कार,

प्रधानमंत्री ज्यू,

तपाई ले मेरो हार्दिक स्वागत र सत्कार गर्नुभयो

यस लाई म हार्दिक आभार व्यक्त गर्द छूँ

 

मित्रहो,

नेपाळ समवेत माझे फार जुने नाते आहे, मात्र पंतप्रधान या नात्याने  नेपाळचा हा माझा तिसरा दौरा आहे. नेपाळप्रती, भारत-नेपाळ संबंधाप्रती, माझी आणि माझ्या सरकारची कटिबद्धता यातून प्रतीत होत आहे. मी पंतप्रधान या नात्याने आलो किंवा सामान्य व्यक्ती म्हणून आलो तरी नेपाळच्या जनतेने मला नेहमी आपले मानले आहे आणि कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे माझे स्वागत केले आहे. या आपलेपणासाठी, आपुलकीच्या स्वागत-सत्कारासाठी मी पंतप्रधान ओली यांचे, त्यांच्या सरकारचे आणि नेपाळच्या जनतेचे आभार मानतो. नेपाळ समवेत  भारताचे संबंधही दोन सरकारमधल्या संबंधापेक्षा, मैत्रीपूर्ण, कौटुंबिक आहेत आणि जनतेतल्या दृढ संबंधाच्या मजबूत पायावर  ते उभे आहेत.

मित्रहो,

माझा नेपाळ दौरा अशा ऐतिहासिक प्रसंगी होत आहे जेव्हा नेपाळमध्ये संघीय, प्रादेशिक आणि स्थानिक अशा तीन स्तरावर निवडणुकांचे सफल आयोजन झाले आहे. नेपाळच्या इतिहासात हा कालखंड सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. नेपाळच्या जनतेने, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आणि परिवर्तनासाठी, राष्ट्र निर्माणासाठी, पंतप्रधान ओली यांच्या नेतृत्व आणि दूरदर्शीपणावर विश्वास  व्यक्त केला आहे. नेपाळच्या जनतेने संघीय आणि लोकशाही ढाच्या मधे राष्ट्र निर्माण आणि विकास यात्रेच्या घेतलेल्या या निर्णयाचे मी अभिनंदन करतो. अखंड, समृद्ध आणि बलवान नेपाळसाठी सर्व नेपाळी जनतेच्या आकांक्षाना भारताचा पाठींबा असून सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक समृद्धीचे  आपले  प्रयत्न यशस्वी ठरावेत यासाठी भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या शुभेच्छा आपल्या समवेत आहेत.

मित्रहो,

मागच्या महिन्यात पंतप्रधान ओली यांचे  भारतात स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली. दोन्ही देशाच्या विकासासाठी आमच्या दृष्टीकोना बाबत आमची चर्चा झाली. नेपाळच्या राजधानीत त्यांच्या समवेत मी इथे उपस्थित आहे हे माझे भाग्य आहे. शेजाऱ्यांशी संपर्क आणि मैत्रीसाठी भारताच्या दृष्टीकोनाची झलक माझ्या या दौऱ्यातून आपल्याला पाहायला मिळेल.

मित्रहो,

भारतासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हा दृष्टीकोन आणि नेपाळसाठी ओली यांची; ‘समृध्द नेपाळ, सुखी नेपाळी’ ही घोषणा परस्पर पूरक आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातल्या भागीदारीच्या सर्व पैलूंचा  आम्ही पुन्हा आढावा घेतला. पाच आठवड्यापूर्वी पंतप्रधान ओली, भारतात आले होते तेव्हा त्यांनी अनेक विषयांचा उल्लेख केला होता. मला आनंदआहे की दोनही देशाच्या चमुनी सर्व मुद्यांवर एकत्र काम करून काही मुद्यांचे निराकरणही केले आहे. या प्रगतीबद्दल मी ओली यांना आजच्या चर्चेदरम्यान विस्तृत माहिती दिली. कृषी, देशांतर्गत जल वाहतूक आणि रेल्वे क्षेत्रात अनेक परिवर्तनशील उपक्रमांची सुरवात केली. यामुळे दोनही देशातली जनता आणि व्यवसाय यामधले दळवळण वाढेल. देशांतर्गत जलमार्ग या क्षेत्रातले आमचे सहकार्य विशेष महत्वपूर्ण आहे असे मी मानतो. नेपाळ भू मार्गाने आणि जल मार्गानेही जोडलेला राहावा हे पंतप्रधान ओली यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि प्रयत्न करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. दोन्ही देशांचे कृषी मंत्रीही लवकरच भेटून कृषी संस्था, कृषी शिक्षण आणि कृषी विकास सहयोग यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करणार आहेत. रक्सौल आणि काठमांडू दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गासाठीच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातले संबंध आणखी दृढ करण्यासाठी आम्ही लवकरच व्यापार कराराचा सर्वंकष आढावाही घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आम्ही नवे पाऊल उचलले आहे. काठमांडू मधल्या भक्तपूर कर्करोग रुग्णालयात, कर्क रुग्णांच्या  उपचारासाठी, भारतात विकसित झालेले भाभाट्रोन रेडीओ थेरपी मशीन लवकरच बसवणार आहोत.      

मित्रहो,

जल संसाधन आणि उर्जा सहयोग क्षेत्रात आज नवा अध्याय सुरु झाला आहे. पंतप्रधान ओली यांच्यासमवेत, 900 मेगावॉटच्या अरुण थ्री  विदुयत योजनेची पायाभरणी करण्याचे भाग्य मला लाभले. सुमारे 6000 कोटी रुपये गुंतवणुकीची ही योजना नेपाळमधे होणाऱ्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. यामुळे रोजगार संधी वाढण्याबरोबरच नेपाळमधे आर्थिक आणि व्यावसायिक संधीही वाढणार आहेत. पंचेश्वर प्रकल्प, जल विद्युत, जल संसाधन आणि उर्जा क्षेत्रात सहकार्य असलेल्या अन्य प्रकल्पांबाबतही बोलणी प्रगतीपथावर आहेत. आपल्या जनतेच्या विकासासाठी दळण वळण अतिशय महत्वाचा घटक आहे यावर उभय देशांचे एकमत झाले आहे. अनादी काळापासून आपण हिमालयीन पर्वतरांगा आणि नद्यांच्या माधमातून एकमेकांशी जोडले गेलो आहोत आणि आता आपण रस्ते, रेल्वे, विद्युत वाहिन्या, तेल वाहिन्या या माध्यमातून हे दळण वळण आणखी मजबूत करण्यावर भर देत आहोत. 

मित्रहो,

भारत- नेपाळ यांच्यातल्या मजबूत संबंधात आपली खुली सीमा विशेष भूमिका बजावत आहे. आम्ही या खुल्या सीमेचा, कोणत्याही असामाजिक तत्वाकडून दुरुपयोग करू देणार नाही. पंतप्रधान ओली आणि मी द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी कटी बद्ध आहोत. खुल्या सीमा याशिवाय आपल्या संबंधाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपले प्रगाढ आध्यात्मिक संबंध. 2014 मधे मी नेपाळमधे आलो होतो तेव्हा भगवान पशुपतीनाथांचे आशीर्वाद घेण्याची संधी मला  लाभली होती. आज सकाळी जानकी मंदिरात, सीता मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. उद्या सकाळी मुक्तीनाथ आणि पशुपतीनाथजी प्रांगणात त्यांची प्रार्थना करण्याचे भाग्य मला लाभेल अशी आशा आहे. दर वर्षी माझ्यासारखे लाखो भाविक नेपाळला भेट देतात. म्हणूनच भारत आणि नेपाळ यांच्यातल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण आणि बौद्ध परिक्रमा विकासाबाबत, पंतप्रधान ओली आणि मी आज चर्चा केली. यासाठी ठोस पाऊलेही उचलली.

मित्रहो,

गेल्या महिन्यात दिल्लीत आणि आज इथे, काठमांडू इथे झालेल्या चर्चे दरम्यान घेतलेल्या निर्णयांमुळे, भारत-नेपाळ संबंधाना एक नवी उर्जा, नवी गती आम्ही दिली आहे. आज भारत-नेपाळ संबंधाबाबत विचार करताना

  आशावादी  विचार राहतात. ही आशा, विश्वास, भरवसा आणि मित्रत्वाच्या भावनेने मी पुन्हा एकदा पंतप्रधान ओली, त्यांचे सरकार आणि नेपाळच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.

भारत-नेपाळ मैत्री

 अमर रहोस

धन्यवाद.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1532137) Visitor Counter : 95


Read this release in: English