माहिती आणि प्रसारण मंत्रालय
15 व्या आशिया माध्यम परिषदेमध्ये “माध्यम नियामक धोरण: आचारसंहिता, नियम आणि कायदे” विषयावर मार्गदर्शन
सामान्य माणसाच्या सशक्तीकरणाचे दायित्व प्रसार माध्यमांनी निभावण्याची आवश्यकता : रविशंकर प्रसाद
Posted On:
10 MAY 2018 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2018
प्रसार माध्यमांना आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याची तरतूद भारतीय घटनेने केली आहे आणि भारत सरकारचेही तसेच धोरण आहे. सामान्य माणसाच्या सशक्तीकरणाचे दायित्व प्रसार माध्यमांनीही निभावण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान आणि विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली येथे केले. ते 15 व्या आशिया माध्यम शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते.
प्रसारमाध्यमांना माहिती प्रसारित करण्याचा, टीका करण्याचा, सल्ला देण्याचा पूर्ण अधिकार आहे. काही विशिष्ट मर्यादेच्या अधीन राहून प्रसार माध्यमांनी कार्य करावे असे घटनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र माहिती चोरुन तिचा अयोग्य वापर केला जाणे हे बरोबर नाही. अशा गोष्टींना भारतात परवानगी दिली जाणार नाही असे रविशंकर प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकारितेमधील आचारसंहिता, नैतिकता याविषयी बोलतांना रविशंकर म्हणाले की, “योग्य, सत्य माहिती चांगल्या पद्धतीने सादर केली जाणे अपेक्षित आहे. मात्र आज माध्यमांमध्ये सनसनाटी वृत्त देण्याची स्पर्धा सुरु आहे. त्यातूनच पैसे देऊन तयार केलेल्या, खोट्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे”.
प्रसार माध्यमांनी अशा सनसनाटी वृत्त्तांकनाच्या मागे न लागता, स्वत:लाच काही नियम लावून घेतले तर अधिक चांगले होणार आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
आजच्या काळात समाज माध्यमांचे आव्हान मोठे आहे असे सांगून प्रसाद म्हणाले, सरकार समाज माध्यमांचा आदर करते. सामान्य माणसाला त्यामुळे सशक्त बनवण्याचे काम होत आहे. परंतु काही वेळेस या माध्यमांमध्ये वापरली जाणारी भाषा अतिशय चिंतेचा विषय आहे.
या परिषदेत बांगलादेशचे माहिती मंत्री हन्सूल हक आयनू, कंबोडियाचे माहिती मंत्री डॉ. खियू कनहारिथ, कोरियाचे स्थायी आयुक्त सॅम सिओग को, न्यायमूर्ती सी.के.प्रसाद यांची भाषणे झाली. यु.के.बॅरिस्टर डॉ. वेंकट अय्यर यांनी या सत्राचे संचालन केले.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1531819)