राष्ट्रपती कार्यालय

65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, भारतीय चित्रपट भारतीय संस्कृतीचे निर्यातदार आणि परदेशी भारतीयांना जोडणारा दुवा-राष्ट्रपती

Posted On: 03 MAY 2018 10:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 मे 2018

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण केले. भारतीय चित्रपटांतून देशाच्या विविधतेचे दर्शन होते, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. ‘अनेक चित्रपटातून भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या आदर्शांचे पालन करण्याचा संदेश दिला जातो, ते आपले मनोरंजन करतांनाच आपल्याला सुजाणही बनवतात. समाजासमोर असलेली आव्हाने आणि समस्या, यांचा आरसाही हे चित्रपट आपल्याला दाखवतात, आणि हे सगळं आज जागतिक स्तरावर पोचलेल्या भाषेतून हे चित्रपट मांडतात,’ अशा शब्दांत राष्ट्रपतींनी भारतीय चित्रपटांचा गौरव केला.

भारतात विविध भाषांमधले चित्रपट बनत असले तरीही चित्रपटाची आपली एक भाषा आहे. हिंदी भाषेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम चित्रपटांनी निश्चितच केले आहे. मात्र, चित्रपटांच्या भाषेतून प्रादेशिक भाषांमधले कलाकार आणि त्यांचा अभिनय, दिग्दर्शन, संगीत, कुठलेही अडथळे न येता, इतर भाषेतल्या रसिकांपर्यंत पोहोचले आहे. हिच, भारताची सांस्कृतिक देवघेव आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

संस्कृतीसोबतच सिनेमा एक व्यवसायही आहे. दरवर्षी सुमारे 1500 चित्रपट बनवणारी भारतीय चित्रपटसृष्टी जगातला सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. परदेशातही भारतीय चित्रपट बघितले आणि वाखाणले जातात. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना देशाशी, इथल्या आठवणींशी जोडून ठेवणारा तो महत्त्वाचा दुवा आहे, असे त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे संधीत रुपांतर करण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीचा खर्चही कमी झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकही कमी खर्चात चित्रपटनिर्मिती करू शकतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1531307) अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein: English