पंतप्रधान कार्यालय

स्वीडनमधील भारतीयांना उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 17 APR 2018 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018

 

माझे मित्र, स्वीडनचे आदरणीय पंतप्रधान श्री लोवेन,

भारतीय वंशाचे, उर्जेने परिपूर्ण असे माझे सर्व मित्र,

स्वीडन निवासी आणि इतर सर्व मित्र परिवार,

शुभ संध्या!

आपणा सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार.

स्वीडनमध्ये माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मी येथील जनतेचा आणि सरकारचा, विशेषत: स्वीडनचे आदरणीय राजे आणि स्वीडनचे पंतप्रधान श्री लॉफवेन, यांचा मनापासून आभारी आहे.

पंतप्रधान लॉफवेनजी, आपण नुकतेच आपल्या वक्तव्यात जे काही म्हणालात, ते ऐकून माझे मन भरून आले आहे. काल रात्री त्यांनी स्वत: विमानतळावर येऊन माझे स्वागत केले. इतकेच नाही तर मला हॉटेलपर्यंत ते स्वत: घेऊन आले.

हा केवळ माझा नाही तर आपणा सर्वांचा, सव्वाशे कोटी भारतीयांचा सन्मान आहे. याच भावनेसह 2016 साली ते मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. गेल्या वर्षी स्वीडनमध्ये आयोजित अशाच प्रकारच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले.

स्वीडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांबद्दल त्यांच्या मनात जी स्नेहाची भावना आहे, भारताबद्दल त्यांच्या मनात जे प्रेम आणि आपुलकी आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. 

मी आपणा सर्वांना विनंती करतो की स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करावे.

मित्रहो, आपल्या नाविन्यपूर्ण कौशल्यामुळे, व्यावसायिक दृष्टीकोनामुळे, सांस्कृतिक एकात्मतेच्या भावनेमुळे आणि भारतीय मूल्यांच्या माध्यमातून आपण येथे आपली एक विशिष्ट प्रतिमा तयार केली आहे.

भारताबाहेर राहत असूनही आपण ज्याप्रकारे भारतीयत्वाची, भारताच्या आत्म्याची भावना जपून ठेवली आहे, त्यासाठी मी आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

आपणापैकी कोणी तमीळ भाषिक आहे, तर कोणी तेलगु. कोणी कन्नड भाषा बोलते तर कोणी मल्याळम. कोणी बांगला तर कोणी मराठी. भारतात सुमारे 100 भाषा आहेत आणि 1700 बोलीभाषा आहेत. त्या सगळ्यांची नावे मी आता य़ेथे सांगू लागलो तर कदाचित उद्याही माझे भाषण सुरू होऊ शकणार नाहीत.

भाषा वेगळ्या असू शकतील, स्थिती-परिस्थिती वेगळी असू शकेल, मात्र एक गोष्ट अशी आहे जी आपणा सर्वांना एका समान सूत्रात बांधून ठेवते, ती म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान.

ही अशी भावना आहे, जी आपल्याला परस्परांशी बांधून ठेवते, जोडते, कठीण काळातही सोबत उभे राहण्याची प्रेरणा देते, नवी उर्जा देते, नवा संकल्प देते.

हीच ती भावना आहे, ज्यामुळे कधीही कानावर वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा कानावर पडल्या की आपण आपल्याही नकळत उठून उभे राहतो.

हीच ती भावना आहे, जिच्यामुळे भारताच्या प्रत्येक यशाबद्दल, मेरी कोम आणि सायना नेहवालच्या प्रत्येक विजयानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते.

मित्रहो, आज आपला देश परिवर्तनाच्या काळातून संक्रमण करत आहे. आज भारत असे एक सरकार आहे, जे भारताच्या सन्मानासाठी, भारताच्या स्वाभिमानासाठी, 21 व्या शतकात भारताला नव्या शिखरावर पोहोचविण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करीत आहे.

चार वर्षांपूर्वी भारतातील जनतेने आम्हाला ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणत अभूतपूर्व असा निर्णय दिला होता.

गेल्या चार वर्षांत आम्ही विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीसाठी, नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी पर्यत्न केले. स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत अर्थात 2022 सालापर्यंत आम्ही ‘संकल्प से सिद्धि’ हे व्रत अंगिकारले आहे.

त्याचबरोबर आम्ही जगभरात भारताच्या समृद्ध परंपरेप्रति, भारतीयत्वाच्या आदरात भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस असो वा आयुर्वेद. ‘वसुधैव कुटुंबकम चा प्राचीन भारतीय दृष्टीकोन असो, वा निसर्गाशी संतुलन आणि समन्वय साधणे. आमच्या प्रयत्नांतून आणि आपल्या सहकार्याने आम्ही भारताला पुन्हा एकदा जगात ‘वैचारिक नेतृत्व’ हे स्थान देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

मित्रहो, इतकेच नाही. आफ्रीका असो वा प्रशांत महासागर क्षेत्र परिघातील लहान देश,  आसियान असो, युरोप असो वा आशिया, सर्वच आज भारताकडे एक विश्वासार्ह सोबती, सच्चा मित्र म्हणून पाहत आहेत.

नेपाळमधील भूकंप असो वा श्रीलंकेतील पूर, जेव्हा संकट येते तेव्हा माणुसकी भारताकडे पाहते. येमेनमधील युद्धातून आम्ही चार हजारपेक्षा जास्त भारतीयांनाच नाही तर सुमारे दोन हजार परकीय सुरक्षित बाहेर काढले.

गेल्या चार वर्षात आम्ही अनेकदा लागोपाठ अशी काही पावले उचलली की त्यामुळे भारताबद्दल जगभरातील नेत्यांच्या मनात आशा आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

आपणास माहिती असेल की काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत हरीत वसुंधरेचे ध्येय गाठण्यासाठी अगदी कमी काळात 60 पेक्षा जास्त देशांशी जोडला गेला आहे.

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण क्षेत्र असो, ऑस्ट्रेलिया गट असो किंवा वासेनार व्यवस्था असो, तिन्ही क्षेत्रात भारताचे सदस्यत्व, हे आंतरराष्ट्रीय समुदायात भारताच्या वाढत्या प्रभावाचे आणि स्वीकारार्हतेचे प्रतिक आहे.

मित्रहो, आपल्या तंत्रज्ञानविषयक क्षमतेचे सामर्थ्य जगाने मान्य केले आहे. भारताचा अंतराळ कार्यक्रम हा जगातील सर्वोच्च 5 संशोधन कार्यंक्रमात गणला जातो. भारताचा अंतराळ कार्यक्रम हा उच्च दर्जाचा असण्याबरोबरच किफायतशीरही आहे. याच कारणामुळे, असे देश, ज्यांच्याकडे स्वत:चा अंतराळ कार्यक्रम नाही, ते आज आपल्याकडे आशेने पाहत आहेत. गेल्याच वर्षी आपण दक्षिण आशियाई उपग्रहाचे प्रक्षेपण केले, जो आपल्या शेजारी देशांसाठी उपयुक्त ठरत आहे.

मित्रहो, देशात आम्ही विश्वासार्हता आणि पारदर्शकतेची खातरजमा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

डिजीटल पायाभूत सुविधांमुळे आता सरकार आणि नागरिकांमधील संबंधांचे आयाम बदलले आहेत. सरकारपर्यंत पोहोचणे ही आता विशेष बाब राहिली नसून नियमित बाब झाली आहे. अगदी सार्वसामान्य नागरिकही आता सरकारशी थेट संवाद साधू शकतो.

सराकरची काम करायची जी जुनी पद्धत आपल्या मनात होती, ती बदलते आहे. आता कार्यालयांमध्ये फाइल थांबवून ठेवण्याची संस्कृती नाही तर वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे.

आज भारतात उद्योग करणे सोपे झाले आहे. तब्बल 42 स्थानांची झेप घेत भारत उद्योग करण्यातील सुलभते विषयक क्रमवारीत पहिल्यांदाच सर्वोच्च 100 देशांमध्ये पोहोचला आहे.

देशाच्या अप्रत्यक्ष कर क्षेत्रात केलेली ऐतिहासिक सुधारणा अर्थात वस्तु आणि सेवा कररचना, उद्योग विश्व स्वीकारत आहे. देशाच्या करप्राप्तीत अभूतपूर्व वाढ होत आहे आणि जे उद्योजक पूर्वी काळजीत असत ते आता चिंतामुक्त झाले आहेत.

सामाजिक कल्याणासाठी जनधन बँक खाते, आधारची ओळख आणि मोबाइल तंत्रज्ञानाविषयी आपण ऐकले असेल. या तिन्हीचे एकत्रिकरण करून थेट लाभ हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे सर्व कल्याणकारी योजनांचा थेट लाभ योग्य लाभार्थिंना मिळत आहे. हे सरकार गरीबांचे आहे, हे यातून स्पष्ट होते आहे. एक काळ असा होता की कधीही न जन्मलेली मुलगी विधवा होत असे आणि तिला विधवा म्हणून निवृत्तीवेतन जारी केले जात असे. काय स्थिती होती, ते समजले ना? मात्र आज ही आज ही स्थिति बदलली आहे आणि गरीबीना त्यांच्या हक्काचे पैसे थेट मिळत आहेत. जी बनावट नावे समोर येत होती, त्यांचीही नावे निकाली निघाली. या एकमेव योजनेमुळे सुमारे 83 हजार कोटी रूपये अर्थात 12 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम चुकीच्या हाती जाण्यापासून वाचली, हे ऐकून तुम्हाला निश्चितच आनंद होईल.

मित्रहो, पूर्वी गरीबी हटावच्या गप्पा होत, घोषणा दिल्या जात, ती संस्कृती आता मागे पडली आहे. देशाच्या गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी सक्षमिकरणाचे साधन वापरले जात आहे.

सक्षमिकरण, मग ते समाजातील दुर्बल घटकांचे असो वा महिलांचे, सबका साथ – सबका विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात साकार झाल्याचे दिसत आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत, आम्ही देशभरातील गरीब महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर मोफत देत आहोत. 2020 सालापर्यंत आम्ही 80 दशलक्ष्य जोडण्यांचे लक्ष निर्धारित केले आहे. आणि 2 वर्षांपेक्षा कमी अवधीत सुमारे 36 दशलक्ष जोडण्या दिल्या आहेत.

आमच्या माता आणि भगिनींना पूर्वी जेवण बनवताना दिवसाला 400 सिगरेटचा धूर सोसावा लागत असे, आज त्यांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळत आहे.

स्वयंपाकासाठीच्या गॅसची उपलब्धताही चांगली झाली आहे. आपल्यापैकी अनेक जणांनी कित्येक वर्षांपूर्वी भारत देश सोडला असेल. कदाचित आपल्याला आठवत असेल की स्वयंपाकासाठीच्या गॅसचा काळा बाजार होत असे. त्यासाठीही विनवण्या कराव्या लागत. काही वेळा शेजाऱ्यांकडून सिलेंडर मागावा लागत असे, तेव्हा त्या घरात अन्न शिजत असे. आज असे चित्र दिसते की एजन्सीवाले स्वत:च आपल्या मोबाइलवर कॉल करतात आणि विचारतात, बरेच दिवस झाले, सिलेंडर आणू का?

मुद्रासारख्या सुक्ष्म वित्तीय योजनेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील नवउद्यमींना संधी दिली जात आहे. ज्या लोकांना कोणीही कर्ज देत नसे, ज्यांच्या लहान लहान उद्योगांना कोणताही वित्तीय आधार नसे, त्यांच्यासाठी आम्ही मुद्रा योजना तयार केली. याचा परिणाम असा झाला की या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 5.3 लाख कोटी रूपये अर्थात सुमारे 90 अब्ज डॉलर्सची 12 कोटी (120 दशलक्ष) कर्जे देण्यात आली आहेत. ही 120 दशलक्ष कर्जे नाहीत, ही 120 दशलक्ष स्वप्ने आहेत, जी साकार करण्यासाठी आम्ही एक व्यवस्था उभारली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते आहे. महत्वाचे म्हणजे या नवउद्योजकांमध्ये 74 टक्के महिलांचा समावेश आहे.

अटल नाविन्यता मोहिम, स्कील इंडिया आणि स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठीची यंत्रणा उभारली जाते आहे.

या वर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये एक लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हजारो विद्यार्थ्यांनी देशासमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवले. मी सुद्धा व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील या युवा प्रतिभावंतांसोबत काही वेळ व्यतीत केला.

अशा प्रकारच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय भागिदारीही निर्माण करत आहोत. आज आम्ही स्वीडनसोबत नाविन्यता भागिदारी केली. जानेवारी महिन्यात इस्रायलसोबत नाविन्यता आणि उद्योजकतेसाठी iCreate केंद्राचे उद्घाटन केले.

नाविन्यता असो, कौशल्य विकास असो अथवा उद्योजकता असो, जेव्हा नागरिकांचे जीवनमान चांगले असेल तेव्हाच या बाबींचे महत्वही अधोरेखित होते.

जीवनमानात सुधारणा करणे हे आजच्या सरकारचे लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा हमी योजनेची, ‘आयुष्मान भारत’ योजनेची घोषणा आम्ही केली. ही जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी योजना आहे, अशी कोणतीही योजना आज जगातील कोणत्याही देशात नाही. आता आम्ही या योजनेचा पहिला टप्पा सादर केला आहे.

याचे दोन टप्पे आहेत. पहिला म्हणजे देशभरात आरोग्य आणि आरोग्य सुविधेच्या जाळ्याचा विस्तार करणे आणि दुसरा म्हणजे देशातील 40 टक्के सर्वात गरीब जनतेला 5 लाख रूपयाचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे.

बंधु आणि भगिनींनो, या केवळ सुधारणा नाहीत, परिवर्तन आहे. आणि भारताचे परिवर्तन घडवायचे, हा आमचा संकल्प आहे.

मित्रहो, या वर्षी 2 ऑक्टोबरपासून भारतच नाही तर अवघे विश्व महात्वा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करणार आहे. या महामानवाला खरीखुरी श्रद्धांजली देण्यासाठी भारताचे परिवर्तन घडवून आणायचे, असा निर्धार आम्ही केला आहे. आम्हाला फार मोठा प्रवास पूर्ण करायचा आहे. आमचा मार्ग योग्य आहे, याची आम्हाला खात्री आहे आणि निर्धार गाठण्याचा आमचा निर्धार पक्का आहे.

मित्रहो, या परिवर्तीत भारताच्या, नव भारताच्या निर्मितीसाठी स्वीडनसोबतची भागिदारी आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. केवळ स्वीडन नाही तर इतर नॉर्डिक देशांसोबतची भागिदारीही आम्ही एका नव्या उंचीवर नेऊ इच्छितो.

आज मला स्वीडनबरोबरच डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड आणि फिनलँडच्या पंतप्रधानांसोबत चर्चा करायची संधी मिळाली. द्वीपक्षीय चर्चेव्यतिरिक्त पहिल्यांदाच नॉर्डिक देश आणि भारतीय नेत्यांची भारत- नॉर्डिक परिषद नुकतीच झाली. नाविन्यता, कौशल्ये आणि तंत्रज्ञानाधारित सहकार्यासाठी आम्ही परस्पर भागिदारी अधीक दृढपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

मित्रहो, भारताच्या विकासाची कथा आणि आंतरराष्ट्रीय स्थान यात आपले सर्वांचे मोठे योगदान आहे. स्वीडनमध्ये आमचा दूतावास एक असेल पण राजदूत एकच नाही. आपण सर्व भारताचे राजदूत आहात.

मात्र आज मी आपणा सर्वांना येथे एक आग्रहाची विनंती करू इच्छितो. आपण भारताशी केवळ भावनिक संबंध बाळगू नका. आपल्यापैकी जे कोणी संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक करू इच्छितात, त्यांच्यासाठी आज नवोदय होणाऱ्या भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत.

नव भारत आपली प्रतिक्षा करत आहे. आणि आता तर भारत आणि स्वीडन यांच्यात थेट विमानसेवाही सुरू झाली आहे. आता वाट कशाची पाहायची ?

बंधु आणि भगिनिंनो, वेळ कमी आहे. पुढील कार्यक्रमासाठी मला लंडनला पोहोचायचे आहे. मात्र इतक्या कमी वेळेत आपण मला आपणा सर्वांना भेटायची संधी दिलीत, आपणा सर्वांशी बोलायची संधी दिलीत, मला फार बरे वाटले, मनापासून आनंद झाला.

आपण येथे आलात, नव भारताबाबत सांगायची संधी मला दिलीत. या सत्काराबद्दल आणि आशिर्वादाबद्दल पंतप्रधानांचे पुन्हा एकदा आभार. पंतप्रधानांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. भारतीय समुदायाप्रति त्यांच्या मनात जो स्नेह आहे, भारताबद्दल जो स्नेह आहे, आज समोरासमोर येथे येऊन आपण ते दृढ नाते व्यक्त केले आहे. आणि म्हणूनच मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो.

धन्यवाद!!!

 

 

B.Gokhale/M.Pange/D.Rane



(Release ID: 1530693) Visitor Counter : 130


Read this release in: English