माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यांत '16 एमएम' मधील 71 चित्रपटांची नव्याने भर

Posted On: 25 APR 2018 1:42PM by PIB Mumbai

पुणे, 25 एप्रिल 2018

 

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यांत जुन्या काळातील 16 एमएममधील 71 चित्रपटांचीन व्याने भर पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काही गाजलेले मराठी आणि हिंदी चित्रपट आहेत. या 71 चित्रपटांपैकी सुमारे पन्नास चित्रपट असे आहेत की, जे कोणत्याही स्वरूपात आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे  '16 एमएम' चे हे दुर्मिळ चित्रपट म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने एक अनमोल ठेवा ठरला आहे. या 71 चित्रपटांपैकी सुमारे 66 चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल आहेत. 

कृष्णधवल चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठेयांच्या 'वारणेचा वाघ' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असलेला 'वारणेचा वाघ'(1970), प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांची कथा-पटकथा आणि संवाद असलेला आणि राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला 'संत गोराकुंभार' (1967) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा 'केला इशारा जाता जाता' (1965) आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे तर रंगीत चित्रपटांमध्ये भालजी पेंढारकर, दिनकर द.पाटील या दिग्गज दिग्दर्शकांबरोबरच व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' (1972) आणि 'चंदनाची चोळी, अंग अंग जाळी' (1975), 'आयत्या बिळावर नागोबा' (1979), 'सुळावरची पोळी' (1980), दादा कोंडके यांची महत्वाची भूमिका असलेला 'गनिमीकावा' (1981), 'नवरी मिळे नवऱ्याला' (1984), 'गुलछडी' (1984), 'चंबूगबाळे' (1989), 'दे धडक बेधडक' (1990) आणि 'प्रतिकार' (1991) आदी चित्रपटांचा समावेश आहे.

           

या संग्रहात मराठी बरोबरच एकूण 29 हिंदी चित्रपटांचा समावेश असून त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे गाजलेले  'सुहाग' (1979), 'अंधा कानून' (1983), 'नास्तिक' (1983) हे तीन चित्रपट तसेच 'एक दुजे के लिये' (1981), राजकपूरयांचा  'प्रेमरोग' (1982),  'घायल' (1990), 'बोल राधा बोल' (1992), 'विरासत' (1997) आणि 'अंदाज अपना अपना' (1994) आदी चित्रपटांचा समावेश आहे.

        

यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, केवळ चित्रपटांची नावे लक्षात घेता हा संग्रह मोलाचा नाही तर 16 एम एम प्रिंट्सच्या दृष्टीने फार मोठा अनमोल ठेवा चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. ज्या काळात फक्त शहरांमध्ये चित्रपट पाहणे ही केवळ चैनीची बाब होती त्याकाळात ग्रामीण भागात 16 एम एम प्रिंट्सच्या मदतीने चित्रपट दाखविला जात होता आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. 'तंबू' किंवा 'टुरिंग टॉकीज' मध्ये 16 एम एम प्रिंट्सच्या साहाय्याने चित्रपट वितरित केला जात असल्यामुळे चित्रपट खेडोपाडी पोहोंचविण्याचे फार मोठे कार्य त्याकाळात 16 एम एम प्रिंट्समुळे साध्य झाले आहे म्हणूनच '16 एम एम प्रिंट्स'च्या चित्रपटांना चित्रपट सृष्टीत अनन्य साधारण असे महत्व आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ 'तंबू' तसेच 'टुरिंग टॉकीज' मध्ये 16 एम एम चित्रपटांच्या वितरणाचा व्यवसाय करणारे साताऱ्याचे ज्येष्ठ वितरक अण्णा देशपांडे आणि त्याचे चिरंजीव दिनेश देशपांडे यांनी त्यांच्याकडील '16 एमएम प्रिंट्स' चित्रपटांचा हा अनमोल ठेवानुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्दकेला. '16 एम एम' चित्रपटांचा इतिहास जतनव्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने ती नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे.

 

 

 

N.Sapre/Pune/D.Rane



(Release ID: 1530156) Visitor Counter : 244


Read this release in: English