पंतप्रधान कार्यालय

लंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश

Posted On: 19 APR 2018 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2018

 

इंग्लंडमधील लंडन येथे झालेल्या भारत की बात, सबके साथ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या सहभागी भारतीयांशी संवाद साधला .

यावेळी त्यांनी काही व्यक्तींच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.  सहभागी सदस्यांसोबत त्यांनी केलेल्या संवादातील काही प्रमुख अंश :

रेल्वे स्थानक माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान आहे, या रेल्वे स्थानकाने मला जगायला आणि झुंजायला शिकवले.,

रेल्वे स्थानकावर असलेली व्यक्ती होती नरेंद्र मोदी, जी  आज सव्वाशे कोटी भारतीयांचा सेवक म्हणून  लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये उपस्थित आहे.

रेल्वे स्थानकावरच्या माझ्या आयुष्याने मला बरंच काही शिकवलं. पण ते सगळे माझ्या वैयक्तिक संघर्षाचा भाग आहे. मात्र तुम्ही जेव्हा रॉयल पॅलेस म्हणता, तेव्हा ते केवळ माझ्याविषयी नाही तर ते देशातल्या 125 कोटी भारतीयांचे यश आहे, बहुमान आहे.

काही मिळवण्याची इच्छा, आकांक्षा, ही वाईट गोष्ट नाही. एखाद्या व्यक्तीजवळ सायकल असेल तर त्याला स्कूटर घेण्याची इच्छा असते. एखाद्याकडे स्कूटर असेल तर त्याला कार घ्यावीशी वाटेल. इच्छा- आंकाक्षा असणे नैसर्गिक गोष्ट आहे.भारत आता दिवसेंदिवस आपल्या इच्छा आंकांक्षाची स्वप्नं बघणारा देश बनतो आहे.

ज्यावेळी मनात समाधानाची भावना निर्माण होते,त्यावेळी आपली प्रगती खुंटते,आयुष्य तिथेच थांबून जातं. प्रत्येक वयात, प्रत्येक काळात काहीतरी नवे मिळवण्याची क्षमता आयुष्याला गती देते.

आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असणे सर्वात आवश्यक आहे.... मला आनंद आहे की आज सव्वाशे कोटी भरतीयांच्या मनात आशा,आकांशा आणि संकल्पपूर्तीच्या भावना आहेत. आणि त्यांच्या माझ्याकडूनही अपेक्षा आहे.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये माझं नोंदवले जावे, असे ध्येय उरात बाळगून मी जन्माला आलो नाही. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे- देशाला लक्षात ठेवा , मोदीला नाही ! मी तुमच्या सगळ्यापैकीच, देशाचा एक सामान्य नागरिक आहे.

हे खरे आहे की जनतेला आमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत कारण त्यांना माहिती आहे की आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकतो. जनतेला माहिती आहे की जेव्हा ते काही सांगतात, तेव्हा सरकार त्यांचं ऐकते.

लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत कारण मी त्या अपेक्षा पूर्ण करेन असा त्यांना विश्वास वाटतो.

आणि जनतेची अपेक्षा, त्यांना होणारी घाई यातून मला ऊर्जा मिळते. आणि जेव्हा आपण सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा संकल्प घेऊन वाटचाल करतो, तेव्हा आपल्या मनात निराशेचा विचारही येत नाही.

तेव्हा आणि आता यात जमीन अस्मानचा फरक आहे. कारण जर तुमची धोरणं स्पष्ट असतील, तुमची नियत चांगली असेल आणि इरादा सच्चा असेल तर आहे त्या व्यवस्थेतच तुम्ही इच्छित परिणाम साधू शकता.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गांधीजींनी अतिशय वेगळी कामगिरी केली. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जनचळवळीचं स्वरुप दिलं. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी  काहीतरी सहभाग देऊ शकते, हा विश्वास निर्माण करत त्यांनी सर्वसामान्यांना या चळवळीशी जोडलं.

आज विकास ही जनचळवळ बनवणं काळाची गरज आहे.

लोकशाहीत जनसहभाग वाढवून सुप्रशासन साध्य करु शकू.

लोकशाही काही करार नाही, तर ती परस्पर भागीदारी आहे. जनतेची ताकद खूप मोठी असते आणि त्यावर आपला जितका जास्त विश्वास असेल , तितके अधिक चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.

भारताच्या इतिहासाकडे एकदा नजर टाका. भारताने कधीही इतर कुठल्या प्रदेशावर आक्रमण करण्याची, तो जिंकण्याची अभिलाषा बाळगली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारताचे काहीही हितसबंध नव्हते, मात्र तरीही, भारतीय सैनिक या युद्धात लढले. त्यांचा त्याग अपरिमित होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजांमध्ये भारताने बजावलेली भूमिका बघा .

आमचा शांततेवर विश्वास आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, जर कोणी आमच्या देशात दहशतवाद पाठवत असेल तर आम्ही ते सहन करु. आम्ही त्याला चोख उत्तर देऊ, आणि त्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत देऊ. दहशतवाद कधीही स्वीकारला जाणार नाही.

ज्यांना आमच्या देशात दहशतवादाची निर्यात करायला आवडतं, त्यांना मला सांगण्याची इच्छा आहे की भारत आता बदलला आहे  त्यामुळे त्यांचे हे इरादे कधीही सहन केले जाणार नाही.

गरिबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही. मी गरीबीतच लहानाचा मोठा झालो आहे. गरीबी काय असते आणि समाजाच्या मागास घटकात जन्म घेणे म्हणजे काय, याचा मी पुरेपुर अनुभव घेतला आहे. मला गरीब, वंचित आणि तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे आहे.

देशातील 18000 गावांमध्ये वीज नव्हती. अनेक महिलांना आजही स्वच्छतागृहे उपलब्ध नाही. देशातली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मला रात्री झोप येत नाही. भारतीयांच्या, देशातील गरिबांच्या  आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा मी निश्चय केला आहे.

मी सुध्दा तुम्हा सगळ्यांसारखाच सर्वसामान्य माणूस आहे, माझ्यातही सामान्य माणसासारख्या अनेक कमतरता आहेत.

माझे भांडवल आहे- कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि सव्वाशे कोटी जनतेचे प्रेम!

मी माझ्या देशबांधवाना विश्वास दिला होता की माझ्या हातून चुका होऊ शकतील, मात्र चुकीची नियत ठेवून मी काही काम करणार नाही.

आमच्यासमोर लाखो समस्या असतील, पण आमच्याकडे अब्जावधी माणसे आहेत, जी ह्या समस्या सोडवू शकतात.

देशात आरोग्य सुविधा केंद्र असो किंवा मग आजार प्रतिबंधक केंद्र असो, आम्ही प्रत्येक भारतीयांच्या आरोग्यासाठी काम करतो आहोत.

मला लंडनमध्ये एक गोष्ट करायची होती- ती म्हणजे भगवान बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणे !

भगवान बसवेश्वर यांनी लोकशाहीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि समाजाला जोडण्याचे अभूतपूर्व काम केले.

लोकशाही, सामाजिक जागृती आणि स्त्री सक्षमीकरण्याच्या क्षेत्रात भगवान बसवेश्वर यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

आम्ही एक अशी समाजव्यवस्था तयार करतो आहोत, ज्यात सगळ्यांसाठी संधी उपलब्ध असतील.

आज आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खूप काम करतो आहोत, मग ते २०२२ पर्यत कृषीउत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असेल किंवा युरियाची उपलब्धता, युरीयाला कडुलिंबाचे आवरण असेल.. प्रत्येक बाबतीत आम्ही एक निश्चित उद्दिष्ट ठेवून पुढे जातो आहोत.

कुठल्याही बाबतीत, कोणत्याही क्षेत्रात, देशाचे भले करण्यासाठी आम्ही काहीही कमतरता ठेवलेली नाही. 

भारतातले १२५ कोटी लोक माझे कुटुंब आहे.

आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जगतो आहोत, आपण स्वतःला तंत्रज्ञानापासून अलिप्त ठेवू शकत नाही.

भारतीय पंतप्रधानांना इस्त्रायलला जाण्यापासून कोणी अडवले होते? मी इस्त्रायलला जाईन आणि पॅलेस्ताईनलाही जाईन. मी यापुढेही उर्जेच्या आवश्यकतेसाठी सौदी अरेबियाशी सहकार्य करत राहीन आणि मी ईराणशीही संबंध वाढवेन.

भारत कोणासमोर डोळे झुकवून किंवा डोळे वर करुन बोलत नाही तर डोळ्याला डोळा भिडवून चर्चा करण्यावर आमचा विश्वास आहे.

विधायक टीकेशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही.

आमच्या सरकारवर टीका व्हावी,आमच्या चुका सांगितल्या जाव्यात अशी आमची इच्छा आहे. टीकेमुळे लोकशाही मजबूत होते.

मला टीकेविषयी काहीही आक्षेप नाही, मात्र कोणावर टीका करण्यासाठी एखाद्याला अभ्यास करावा लागतो, तथ्ये मांडावी लागतात. मात्र दुर्दैवाने ते आजकाल होत नाही. आजकाल टीका करण्यापेक्षा केवळ आरोप केले जातात.

इतिहासात नाव नोंदवणे हे माझे उद्दिष्ट नाही, मी माझ्या सव्वाशे कोटी भारतीयांपैकीच एक आहे.

इतिहासात नाव नोंदवून घेण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, माझ्या देशाला लक्षात ठेवा मोदीला नाही. मी ही तुमच्याचसारखा भारताचा एक सामान्य नागरिक आहे.

 

B.G/S.P/P.M

 



(Release ID: 1529734) Visitor Counter : 152


Read this release in: English