पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे सार्वजनिक सभेमध्ये केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
12 MAR 2018 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2018
येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता, भगिनी, बंधू आणि नवयुवकांनो,
माझं भाग्य चांगलं आहे, म्हणून आज मला बनारसच्या अनेक विकास योजनांचा शिलान्यास करण्याची, काही प्रकल्प लोकार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु मी आज सर्वात प्रथम बनारसवासियांना लाख लाख धन्यवाद देवू इच्छितो. बनारसवासियांचे लाख लाख अभिनंदन करण्याची माझी इच्छा आहे. आज बनारसने तर कमालच केली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आपण ज्या पद्धतीने, प्रेमाने, आदराने स्वागत केले, त्यांचा जो आदर सत्कार केला तो पाहिल्यानंतर आता फ्रान्समध्ये प्रत्येक घराघरांमध्ये लोक एक प्रश्न नक्कीच विचारणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे, ते बनारस शहर नेमके आहे कुठे, असा तो प्रश्न असेल.
आम्ही जर गाडी वेगाने चालवली नसती, तर अजूनही आम्ही रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित असलेल्या जनतेकडून अभिवादन स्वीकारत प्रवासच करीत राहिलो असतो, इतकी प्रचंड गर्दी आमच्या स्वागतासाठी झाली आहे. गंगेचे सर्व घाट असतील, आम्ही आलो, त्या मार्गावर तर एक -एक इंचभरही जागा शिल्लक राहिली नव्हती. आज एक अव्दितीय दृष्य बनारसच्या लोकांनी आम्हाला दाखवलं. आपल्या आशीर्वादामुळे, आपण दाखवलेल्या या प्रेमामुळे भारत आणि फ्रान्स यांच्या मैत्रीवरही प्रेमाचा वर्षाव तुमच्याकडून झाला आहे, असे मी मानतो. यासाठी बनारसला मी कितीही धन्यवाद देवू केले, तरी ते कमीच पडणार आहेत.
आज मला विन्ध्यवासिनीच्या चरणांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. संपूर्ण जगामध्ये सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त केला गेला पाहिजे, यासाठी चालवण्यात येत असलेल्या मोहिमेमध्ये भारत महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. विश्वभरातील अनेक देशांचे प्रमुख आणि इतर परदेशी पाहुणे काल दिल्लीमध्ये आले होते. या सर्वांनी मिळून सूर्यदेवतेचे सामर्थ्य जाणून घेवून, त्याचा स्वीकार करून आगामी काळामध्ये विकासाच्या राजमार्गासाठी सूर्यशक्तीचा आधार घेण्याच्या दृष्टीने, त्या दिशेने महत्वपूर्ण निर्णय घेतले. आणि याच आधारे मिर्जापूरमध्ये सौर उत्पादन करणा-या विद्युत प्रकल्पाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. हिंदुस्तानच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून आणणारे हे एक चांगले अभियान आहे. आणि मला ही मोहीम खूप पुढे नेण्याची इच्छा आहे. प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल लावलेले असावे आणि घरामध्ये स्वयंपाक हा सौरचुलीवर केलेला असावा. अशावेळी मग आपल्याला स्वयंपाकाच्या गॅसची गरजच भासणार नाही. सौरचुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्याचबरोबर पर्यावरणाचे कसलेही नुकसान होणार नाही. ‘स्वच्छ स्वयंपाक’ अशी एक मोठी मोहीमच आहे.
भारतामध्ये 25 कोटी परिवार आहेत. एक मोठी बाजारपेठ आपल्या देशात आहे. आणि म्हणूनच मी नवयुवकांना आग्रहाने सांगतो, ‘आयआयटी’वाल्यांनाही आग्रहाने सांगतो की, तुम्ही पुढं या. नवसंशोधनामध्ये एक स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. आमच्या माता, भगिनींना चूल पेटवण्यासाठी इतर कोणावरही निर्भर रहावं लागणार नाही, अशा पद्धतीचं नवीन काहीतरी चांगले, त्यांना उपयोगी पडणारे नवतंत्रज्ञानाचे संशोधन करावे. त्यांचा त्रास कमी होईल, असे नवसंशोधन केले जावे. सूर्यदेवतेच्या आशीर्वादाने अगदी विनात्रास, आरामात भोजन बनवणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी इंधनावर खर्चही करावा लागणार नाही. असे संशोधन केले गेले तर, गरीब आणि मध्यमवर्गाची खूप मोठी सेवा केल्याचे फळ मिळणार आहे.
इतकेच नाही तर, आज मला काशी आणि पाटणा यांना जोडणा-या एका नव्या रेल्वे सेवेचा प्रारंभ करण्याची संधी मिळाली. काशी आणि पाटणा यांना जोडणारी वेगवान रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी खूप प्रदीर्घ काळापासून असलेली मागणी आत्ता पूर्ण झाली. आज या सेवेचा प्रारंभ झाला. सकाळी 6.00 वाजता काशीमधून ही गाडी निघेल आणि दहा-सव्वा दहा वाजता पाटण्याला पोहोचेल. सायंकाळी पाच वाजता पाटण्यातून निघालेली गाडी रात्री नऊ -साडे नऊ वाजता पुन्हा काशी येथे परतणार आहे. अतिशय कमीत कमी वेळेमध्ये काशी आणि पाटणा ही शहरे जोडणारी अतिशय वेगवान रेल्वे, ‘काशी-पाटणा जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रारंभ करण्याची संधी आज मला मिळाली. ही गाडी सुरू केल्याबद्दल मी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानतो. मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जनतेची सेवा करण्यासाठी रेल्वेचा कशा पद्धतीने उपयोग केला जावू शकतो, यावर अनेक प्रकारे कार्य सध्या सुरू आहे. आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणजे आज काशी आणि पाटणावासियांची खूप वर्षांपासून असलेली इच्छा आज पूर्ण होत आहे.
ज्या ज्यावेळी मी काशीला येतो, त्यावेळी काशी हे माझं दुसरं घर बनलेले असते. डीएलडब्ल्यू आणि काशी यांची ओळख आध्यात्मिक शहर अशी संपूर्ण जगामध्ये आहे. ‘हर हर महादेव’ या मंत्राने ज्याप्रमाणे काशीला आध्यात्मिक ओळख दिली आहे. त्याचप्रमाणे वाराणसी या शहराला औद्योगिक ओळख ‘डीएलडब्ल्यू’ने दिली आहे. आणि म्हणूनच भारत सरकार डीएलडब्ल्यूचा जितका जास्त विकास होईल, जितका जास्त विस्तार होईल, जितके जास्त आधुनिकीकरण होईल, जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, याचा विचार करत आहे. त्यासाठी अनेक नवनवीन योजना तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळामध्ये या भागातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरण्याचे काम या योजनांमुळे होणार आहे.
आपण सगळ्यांनी अगदी अलिकडेच होळीचा सण साजरा केला. काशीसाठी जवळपास 800 कोटी रूपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. हे 800 कोटी रूपयांची विकासकामे होळीच्या रंगामध्ये एक नवा चांगला रंग भरणार आहेत. होळीच्या रंगांमध्ये नवीन सुगंध आणणार आहेत. होळीच्या सणामध्ये नवा उत्साह, उमंग, उल्हास निर्माण करणार आहेत. आज इथे गरीब कुटुंबियांना घरकुलाची किल्ली देण्याची संधी मला लाभली. मी त्यांना विचारत होतो की, तुम्ही याआधी कुठे वास्तव्य करीत होता? या गरीब लोकांमधला प्रत्येकजण काही काही सांगत होता. कोणी कच्च्या घरात रहात होते, तर कोणी झोपडपट्टीमध्ये रहात होते. तर कोणी असेच कुठंही पथारी पसरत होते. कधी इथे जायचे तर कधी उठून दुसरीकडे जायचे. असे या लोकांचे आयुष्य होते. मी त्यांना विचारलं, आता चांगले घर मिळाले आहे, चांगलं वाटते का? तुम्ही स्वतः जावून घर पाहून आलात का? घर आवडले का? त्या घरांमध्ये काही कमी आहे असे वाटते का? अशा सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारल्या. आणि मग शेवटी त्यांना मी विचारत होतो की, आता घर मिळाले मग मुलांना शिकवणार का? माझ्या या प्रश्नावर त्या लोकांची नजर एकदम खाली जात होती. या लोकांना लाज, शरम वाटत होती. आता राहण्यासाठी तुमच्या घरकुलाची सोय झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही मुलांना शिकवलं पाहिजे, शाळेत पाठवलं पाहिजे. ही तुमचीच जबाबदारी आहे. असा आग्रह मी त्यांना केला.
योगीजी यांनी सत्तेवर येताच अगदी ‘मिशन मोड’वर घरकूल योजना लागू करण्याचा संकल्प केला, याचा मला आनंद वाटतो. भारत सरकारची ही योजना काही आजची आहे असे नाही. मागील सरकारच्या वेळीसुद्धा ही योजना होती. आणि मी इथं काशीमध्येच म्हणालो होतो की, मागचे सरकार या योजनेला साधं नावही देवू शकले नाहीत. परंतु योगीजींनी लाभार्थींची सूची तयार केली. भारत सरकारला सादर केली. त्यानंतर भारत सरकारने या योजनेसाठी निधी मंजूर केला. आणि मग सहा महिन्याच्या आतमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त घरकुले बनवून लोकांना ती देण्यातही आली. आगामी काळामध्ये आठ लाख कुटुंबांना घरकूल देण्याचे आमचे स्वप्न आहे. मला विश्वास आहे की, योगीजी यांच्या नेतृत्वाखाली आमचे हे स्वप्न नक्कीच सत्यामध्ये येईल. अवश्य पूर्ण होईल, तेही अगदी निश्चित केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, हे शक्य आहे.
आजच्या काळामध्ये जर विकास करायचा असेल तर पायाभूत, सुविधा असणे अतिशय महत्वाचे आहे. संपर्क साधनांचे खूप महत्व आहे. संपर्क व्यवस्था मग ती लोहमार्गाची असो, अथवा रस्ते, महामागार्ची, त्यांची अतिशय आवश्यकता आहे. आज शिवपुरी, फुलवरिया चौपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ होत आहे. दोन रेल्वे क्रॉसिंग, दोन नवे उन्नत सेतू बांधण्यात येणार आहेत. बनारसच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरणाचे काम सध्या आम्ही सुरू केले आहे.
आज मला कचरा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आता तर कचरा महोत्सवही होवू लागला आहे, याचे लोकांना खूप आश्चर्य वाटते. ज्या लोकांना मोदी पसंत नाही, ती मंडळी तर या गोष्टीवर टीका ही करणारच. मोदींच्या दृष्टीने आता काही शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे ते आता कचरा महोत्सव साजरा करताहेत, अशी टीका होणारच. आम्ही स्वच्छता मोहीम पुढे घेवून जात आहोत. वेस्टमधून ‘वेल्थ’ची निर्मिती होवू शकते. ‘कबाड’चे काही ‘जुगाड’ जमवून उपयोगी वस्तू नक्कीच बनवता येते. आणि विशेष म्हणजे हे जनआंदोलन होवू शकते. आणि आज या कार्यक्रमाला जे लोक आले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, हे कचरा महोत्सवाचे जे प्रदर्शन लागले आहे, ते आपण सगळ्यांनी आवश्य पहावे. लहान लहान मुले बाटल्या सहजपणाने फेकून देतात. रोज घरामध्ये येणारे वर्तमानपत्र असेच फेकून दिले जाते. या फेकून दिलेल्या गोष्टींमधूनच किती सुंदर वस्तू बनवल्या आहेत, हे पाहून तुम्हा सगळ्यांना नवल वाटेल आणि अशा सुरेख वस्तू आपल्याही घरी ‘शो पीस’ म्हणून ठेवण्याचा मोह तुम्हाला होईल. एकाच गोष्टीचा किती चांगल्या आणि विविध प्रकारे उपयोग होवू शकतो, हे या वस्तू पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.
इथे मी संगीत मंडळही पाहिले. हे अतिशय छान संगीत मंडळ आहे. ही मंडळी स्वच्छतेचे गीत गात आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगीतासाठी वाद्य म्हणून त्यांनी कशाचा वापर केला आहे? तर रिकाम्या डब्यांचा! या डब्यांच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट संगीत वाद्य तयार केलं आहे. रिकाम्या डब्यांचा नादमय आवाज करीत ही मंडळी आपल्याला चांगल्या संगीताचा आस्वाद देत आहेत. याचाच अर्थ सगळ्या दृष्टीने बेकार, काहीही मोल नसलेल्या, बिनकामाच्या वस्तूमधून किती उत्तमोत्तम कलाकृती निर्माण होवू शकते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण मी आज या कचरा महोत्सवामध्ये पाहिले आहे.
वाराणसी शहराला स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. संपूर्ण विश्वभरातून वाराणसीला पर्यटक येत असतात. वाराणसीजवळ सर्व काही आहे. अगदी प्राचीन काळापासून आहे. परंतु आज, जर आपल्याला एकच काम करायचे असेल तर तेच एक काम आपण करायचे आहे. कारण बाकी इतर कामे तर आपल्या पूर्वजांनी आधीच केली आहेत. वाराणसीची कीर्ती, या शहराची शान आमच्या पूर्वजांनी तयार केली आहे. आपल्याला फक्त हीच वाराणसी स्वच्छ ठेवायची आहे.
आपण वाराणसीला चांगले ठेवले तर अख्ख जग वाराणसीला भेट देण्यासाठी प्रेरित होणार आहे. या शहरासाठी 17 वर्षांनंतर नेमक्या कोणत्या गरजांची आवश्यकता भासणार आहे. या शहराला 20 वर्षांनी कशाची आवश्यकता असणार आहे. याचा विचार करून त्यांच्या पूर्ततेसाठी आज काय करावे लागणार आहे, ते करण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. आज या मोहिमेच्या कामासाठीच आम्ही इथे जमलो आहोत. भविष्यातील गरजा ओळखून सागरीय पाणी प्रक्रिया व्यवस्था करणारा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 600 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे आगामी दिवसात किती लोकांना लाभ होणार आहे, याचा अंदाज आपण करू शकतो.
आपण पाहिलं असेल, काशीमध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला तारांचे जाळे लटकताना दिसत होते. काशी शहराला या तारांच्या जंजाळातून मुक्त करण्याचे अभियान आम्ही सुरू केले आहे. आणि देशभरामध्ये जमिनीखालून तारा घालण्याचे काम सुरू केले आहे. या कामाचा प्रारंभ बनारस शहरातून करण्यात आला. विशेष म्हणजे बनारसमध्ये हे काम खूप वेगाने सुरू आहे.
याचप्रमाणे अलिकडेच योगीजी यांनी गुंतवणुकदारांच्या परिषदेचे आयोजन केले होते, त्याचवेळी घोषित केले होते की, राज्यामध्ये संरक्षण विषयक सामुग्री उत्पादनाचे एक स्वतंत्र क्षेत्र तयार करण्यात येईल. यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आणि या उद्योग व्यवसायांमुळे राज्यातल्या जवळपास अडीच लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे या प्रकल्पामध्ये किती संभावना आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. या कामाला आता अधिक वेग देण्यासाठी योगीजी यांचे सरकार आणि भारत सरकार मिळून वेगाने प्रयत्न करीत आहेत.
योगी सरकारने शेतकरी वर्गाची विशेष काळजी घेतली आहे, त्यामुळे मी योगीजींचे विशेष अभिनंदन करू इच्छितो. याआधी उत्तर प्रदेशामध्ये ‘एमएसपी’ घोषित होत होती. परंतु त्या किंमतीला धान्याची खरेदी होत नव्हती. योगींजींनी विशेष लक्ष दिल्यामुळे आता पहिल्यापेक्षा धान्य खरेदी चैपट होत असल्याचे दिसून आले आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. शेतकरी वर्गाला त्यांच्या पिकाला चांगले दाम मिळण्याची संधी प्राप्त होत आहे, ही उल्लेखनीय आणि आनंदाची गोष्ट आहे.
इतकेच नाही, तर ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला त्यांच्या उसाचे पैसे आधीपेक्षा लवकर मिळत आहेत. तसेच त्यांना मिळणारा दरही 40 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून आपल्याला एक लक्षात येईल की, विकासाच्या कोणत्याही योजनेचा लाभ सर्वांना मिळत आहे. मग यामध्ये काशीच्या वेगवेगळ्या कामांचा असेल किंवा पायाभूत सुविधांचे काम असेल अथवा कृषी क्षेत्राचे काम असेल, विद्युत प्रकल्पाचे काम असेल, तसेच रेल्वेचा वेग वाढवण्याचे काम असेल, किंवा नवीन रेल मार्ग सुरू करण्याचे काम असेल, अशा अनेक प्रकल्पांचा शिलान्यास करण्याची आणि अनेक प्रकल्प लोकार्पण करण्याची संधी आज मला मिळत आहे.
आपण सर्वांनी मिळून, एकत्रित काम करून काशीच्या विकासाला एका वेगळ्या, नव्या उंचीवर न्यायचे आहे. अनेक प्रकारच्या योजना राज्य सरकार आणि भारत सरकार काशीमध्ये, पूर्व उत्तर प्रदेशामध्ये सुरू करत आहे. आगामी काही दिवसामध्ये आम्ही एक खूप महत्वाची योजना संपूर्ण देशवासियांसाठी लागू करणार आहोत. तिचे नाव ‘आयुष्यमान भारत’असे आहे. या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत विमा कंपनीच्या मदतीने सर्वांसाठी विमा योजना लागू करण्यात येणार आहे. या विमा योजनेमुळे समाजातल्या गरीबातील गरीब कुटुंबालाही लाभ होणार आहे. त्याच्या परिवारामध्ये कोणी आजारी पडले तर ती एकच व्यक्ती आजारी पडली आहे असे होत नाही. तर संपूर्ण कुटूंबच आजारी होत असते. आर्थिक विवंचना निर्माण होते. त्या परिवाराची सगळी स्वप्ने, सगळ्या योजना विखरून जातात. म्हणूनच गरीब माणूस आजारपण सहन करतो, पण रूग्णालयात जाणे टाळतो. रूग्णालयाचा खर्च त्याला झेपणारा नसतो. तो प्रचंड खर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा असतो. औषधोपचारासाठी त्याच्याकडे पैसे नसतात आणि गहाण ठेवण्यासारखे त्याच्याकडे काही नसते. माझ्या देशाच्या नागरिकाचे असे हाल व्हावेत का?
बंधू आणि भगिनींनो, हे मला मंजूर नाही. आणि म्हणूनच आम्ही ही योजना तयार केली आहे. ज्या गरीब परिवारांना रूग्णालयामध्ये जावून औषधोपचार घेणे परवडणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. देशभरामध्ये दहा कोटी परिवार म्हणजे जवळपास 50 कोटी नागरिक, लक्षात घ्या, 50 कोटी नागरिक आहेत, त्यांचा ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये पाच लाख रूपयांपर्यंत रूग्णालयाचा खर्च भारत सरकार आणि विमा कंपन्या मिळून करणार आहेत. आमच्या या नवीन योजनेमुळे गरीब माणूस आजारी पडल्यानंतर रूग्णालयात जाण्याचे टाळत असे, तो आता लहानसा आजार झाला तरी औषधोपचारासाठी रूग्णालयात जावू शकणार आहे. कारण त्याला आता चांगले माहीत झाले आहे. आपण आजारी पडलो तरी, मोदी सरकार पैसे देणार आहे. आपल्यावर चांगले औषधोपचार होवू शकणार आहेत. आता त्याला असा विश्वास वाटणार आहे की, आजारी राहणे चांगले नाही. त्यापेक्षा सरकारच्या खर्चाने औषधोपचार करून घेणे योग्य ठरणार आहे. चांगले धडधाकट राहून रोजी-रोटी कमवायची असेल तर आधी उपचार केले पाहिजे, हेही आता गरीब लोकांना पटणार आहे.
जे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात, ते लहान- लहान गावांमध्ये आपले रूग्णालय सुरू करीत नाहीत. कारण त्यांना वाटते की, लहान गावांमध्ये कोण आपल्याकडे येणार? आणि आले तरी या गावकरी मंडळींकडून पैसे कसे वसूल करता येणार? परंतु आता डॉक्टर मंडळींना ही चिंताच राहणार नाही. कारण आता त्यांना पैसे नक्की मिळू शकणार आहेत. लोकही आपली खाजगी रूग्णालये बनवू शकणार आहेत. देशामध्ये रूग्णालयांचे चांगले जाळे तयार करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विविध सेवा देवू शकत असलेले लोक तयार करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. आणि देशाला निरोगी बनवण्याच्या दिशेने एक अतिशय महत्वपूर्ण काम आम्ही करू शकणार आहे.
आमच्या देशामध्ये कुपोषणाची खूप मोठी समस्या आहे. ती संपुष्टात आणण्यासाठी आम्ही पोषण मिशन सुरू केले आहे. यासाठी आमच्या सरकारने 9 हजार कोटी रूपये खर्चून योजना तयार केली आहे. आगामी वर्षामध्ये आमची नवीन पिढी, कुमारवयातील मुलांचे त्यांच्या वयानुसार वजन असावे, तसेच योग्यप्रमाणात त्यांची उंची असावी आणि ही मुले अगदी तंदुरूस्त, निरोगी असावीत, कुपोषित राहू नये यासाठी आवश्यक पोषणमूल्ये त्यांना कशी मिळू शकतील, याची व्यवस्था कशी करता येईल? याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये विशेष करून मातांसाठी प्रशिक्षण आयोजित करता येईल का याचा विचार सरकार करीत आहे.
अशा सगळ्या आणि विविध विषयांवर, क्षेत्रांमध्ये काम करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आणि प्रधानमंत्री पोषण मिशन योजना (पीएमपीएम) आम्ही आणली आहे. आता आगामी काही दिवसांमध्ये पोषण मिशन योजना गरीबातल्या गरीब परिवार असो किंवा मध्यम वर्गातला परिवार असो, 12-14- 16 वर्षांच्या कन्या असो, जर हे सर्व निरोगी, तंदुरूस्त नसतील, त्यांचा शारीरिक विकास वयाच्या तुलनेत योग्यप्रकारे होत नसेल तर मोठे संकट त्या मुलीवर ओढवू शकते. काही वर्षांनी ही मुलगी ज्यावेळी माता बनण्याची वेळ येईल, त्यावेळी शारीरिक अशक्तपणामुळे बाळंतपणात तिच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. काही वेळा तर तिचे होणारे मूलही दगावू शकते. किंवा जन्माला येणारे मूल जन्मतःच काही अपंगत्व, कमतरता घेवून जन्माला येवू शकते. अशावेळी संपूर्ण आयुष्यभर त्या मातेला आपल्या अशा व्यंग घेवून आलेल्या मुलाला सांभाळावे लागते. त्या मुलाची सेवा करावी लागते. अशा सगळ्या गंभीर प्रश्नांतून मुक्तता व्हावी, यासाठी सरकारने प्रधानमंत्री पोषण मिशन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि सरकारने त्या दिशेने पावले टाकली आहेत.
काशीवासियांनो, विकासाच्या या सर्व योजनांचा लाभ आपल्या काशीच्या नागरिकांनाही मिळाला पाहिजे. आमच्या सरकारने सुरू केलेल्या गंगेविषयीच्या सगळ्या योजना अतिशय वेगाने कार्यरत आहेत. आणि त्यांचा लाभही आगामी काही दिवसात काशीवासियांना मिळणार आहे.
योगीजी यांच्या सरकारने अनेक विकास कामे अतिशय वेगाने सुरू ठेवल्याबद्दल त्याचबरोबर भारत सरकारच्या योजना झपाट्याने लागू करण्याचे काम सुरू केल्याबद्दल आज मी पुन्हा एकदा योगीजींना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज काशीवासियांनी आमचे जे अव्दितीय, अद्भूत स्वागत केले, त्याबद्दल पुन्हा एकदा अगदी नतमस्तक होवून आपल्या सर्वांना नमस्कार करतो.
खूप खपू धन्यवाद.
BG/SB/PK
(रिलीज़ आईडी: 1528607)
आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English