पंतप्रधान कार्यालय

हॅकेथॉन अंतिम फेरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 30 MAR 2018 10:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  30 मार्च 2018

 

रात्रीचे आठ- साडे आठ वाजलेले असतानाही देशाच्या विविध भागांमध्ये माझ्या देशाचा नवयुवा वर्ग इतक्या मोठ्या यज्ञासाठी स्वतःला झोकून देत आहे. याचाच अर्थ माझा देश बदलतोय, देश पुढे जातोय, प्रगती करतोय.

देशाच्या विविध केंद्रांमध्ये उपस्थित असलेले माझ्या नवयुवा मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या आयोजनाबद्दल मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरजी यांचे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी समुहाचे मी विशेष करून अभिनंदन करतो.

‘स्मार्ट इंडिया’च्या स्मार्ट नवसंशोधकांशी संवाद साधणे म्हणजे माझ्या दृष्टीने हा नेहमीच एक सुखद अनुभव असतो. वेगवेगळ्या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करीत असता. आपले हे कार्य खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे.

आपण सर्वजण गेल्या काही तासांपासून आपले ‘मिशन’ पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यरत आहात. परंतु मी मात्र माझ्या समोरच्या पडद्यावर वेगळंच दृश्य पाहत होतो. मला आपल्यामधला उत्साह, उमंग, मिशन पूर्ण करण्यासाठी आपण करीत असलेली धडपड हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की, तुम्हा नवयुवकांना थकवा जाणवत नाही, परंतु तुमच्यावर कसल्यातरी प्रकारचा तणाव असल्याचे नक्कीच जाणवत आहे. तुम्हा लोकांची धडपड, तुमचे प्रयत्न, तुमचा उत्साह पाहून माझा थकवाही कमी होवून गेला. आजची ही पिढी ज्यावेळी राष्ट्राच्या उभारणीसाठी अशाप्रकारे सातत्याने प्रयत्न करीत असते, त्यावेळी नवभारताच्या निर्मितीची प्रक्रिया अधिकच मजबूत, पक्की होत जाते.

मित्रांनो, मी मागच्या वेळीही ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये आलो होतो. आता पुन्हा एकदा मला विचारण्यात आलं की, तुम्ही पुन्हा हॅकेथॉनला जाणार का? त्यावर मी म्हणालो, हो तर, का नाही जाणार, जरूर जाणारच आहे. या नवयुवकांना भेटण्याची मला खूप इच्छा आहे. आपल्याला भेटायचं आहे, तुमच्याकडच्या वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची आहे, इतकंच नाही, तर तुमच्याकडून नवीन काही, वेगळे शिकण्याचा प्रयत्नही मला करायचा आहे.

एखादी व्यक्ती जर आपणच सर्वज्ञानी आहे, असा विचार करीत असेल, सगळं काही आपल्याला माहिती आहे, आपल्याला सर्व काही येते असे त्या व्यक्तीला वाटत असेल, तर मला वाटतं, त्या व्यक्तीची यापेक्षा मोठी चूक कोणतीच असणार नाही. आणि अगदी याप्रमाणेच जर एखादे सरकारही जर स्वतःविषयी वेगळाच विचार असेल, जे काही करायचे आहे, ते सरकार करेल, सरकार आपल्या एकट्याच्या जीवावर सगळं काही करू शकते, असा विचार सरकारचा असेल तर मला वाटतं की ही सुद्धा त्या सरकारची एक मोठी चूक असणार आहे. आणि म्हणूनच मी ‘सहभागीता’यावर खूप भर देत असतो. प्रशासनामध्ये सगळ्यांची सहभागीता असली पाहिजे, असं मला वाटतं.

या देशाच्या सव्वाशे कोटी लोकांच्या इच्छाशक्ती आणि श्रमशक्तीपेक्षा दुनियेतील कोणतेही आव्हान मोठे नाही. ज्याठिकाणी 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, ज्या ठिकाणी भौगोलिक लाभ विस्ताराने मिळू शकतात, अशा देशामधल्या लोकांनी जर का निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही, हे मात्र नक्की.

विशेष करून मला या आजच्या नवयुवकांविषयी बोलायला जास्त आवडणार आहे. आपल्या सगळ्यांमध्येच जोश आहे, सळसळता उत्साह आहे. नवभारताच्या उभारणीसाठी अनेक आशा, आकांक्षा तुमच्या आहेत. आणि हे सगळे पाहूनच माझा तुमच्यावर असलेला विश्वास अनेकपटींनी वाढवला आहे. 21व्या शतकामध्ये  हिंदुस्थानला जे मिळालं पाहिजे, जो या देशाचा अधिकार आहे, जे स्थान या राष्ट्राला मिळाले पाहिजे, ते स्थान मिळवून देण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच आहे. असा विश्वास मला तुमच्याकडे पाहिलं की वाटतो.

आता हा विश्वास मला कसा काय वाटतो, याचे कारणही इथे देतो. युवा व्यावसायिक, युवा मुख्य कार्यकारी अधिकारी, युवा संशोधक, नोकरशाहीतील युवा अधिकारी यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची एकही संधी मी कधीच दवडत नाही. आपल्यामध्ये असलेला हा उत्साह, ही ऊर्जाच नवभारताच्या निर्मितीच्या दृष्टीने सर्वात मोठी, महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हीच खरी देशाला प्रगतीपथावर पुढे नेणारी  शक्ती आहे.

आता या बरोबरच काही प्रश्नही उपस्थित होतात. नवभारताची निर्मिती करताना परिवर्तन घडवून आणताना इतके मर्यादित प्रयत्न करून चालणार आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर आहे, नाही! अजिबात नाही. नवभारतासाठी प्रत्येक समस्येच्या मूळाशी जावून, ती समस्या समूळ नष्ट करण्यासाठी उपाय योजना केली पाहिजे. यासाठी विशिष्ट चौकटीबाहेर जावून, वेगळा विचार केला पाहिजे. समस्या सोडवताना नवनवीन पद्धती, नवनवीन मार्गांचा शोध घेतला पाहिजे.

आमच्या सरकारने हा सगळा विचार केला, वेेगवेगळे प्रयत्न केले आणि  म्हणूनच आम्ही ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या माध्यमातून नवसंकल्पना, नवसंशोधन इथंपर्यंत पोहोचलो आहेत.

मागच्या वर्षी जे हॅकेथॉन झाले, त्यामध्ये आलेल्या जवळपास 60 प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यांपर्यंत आले आहे. त्यापैकी अर्धे म्हणजे 30 प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. आणि उर्वरित आगामी दोन-तीन महिन्यांमध्ये  पूर्ण होणार आहेत. अशी माहिती मला देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी हॅकेथॉनमध्ये जवळपास 40हजारपेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवला होता. आता यावर्षी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली असून एक लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षी केंद्र सरकारच्या 27 मंत्रालयांच्या मदतीने राज्य सरकारेंही या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. हॅकेथॉनमध्ये सॉफ्टवेअर एडिशन बरोबरच आगामी काही महिन्यांमध्ये हार्डवेअर एडिशनही सहभागी करण्यात येणार आहे, अशी माहिती मला नुकतीच देण्यात आली आहे.

अशा प्रकारे नवनवीन प्रयोग हॅकेथॉनमध्ये केले जात आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्व नवयुवकांचे आणि वेगवेगळ्या मंत्रालयांचे त्याचबरोबर राज्य सरकारांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.

यावर्षी आपण पूर परिस्थिती व्यवस्थापन आणि जंगलामध्ये पेटत असलेल्या आगी, लागणारे वणवे यासारख्या अतिशय गंभीर समस्यांवर उपाय शोधून काढणार आहात, अशी माहिती मला देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण जे प्रयत्न करीत आहोत, त्याला नक्कीच यश येईल, आणि आपण निश्चित केलेले ध्येय गाठू शकणार आहोत, असा मला विश्वास आहे.

मित्रांनो, ज्ञान हीच खरी शक्ती आहे, आणि नवसंशोधन, नवसंकल्पना यांच्या माध्यमातूनच आपला विकास  होणार आहे, अशा काळात आपण आज वावरत आहोत. परंतु याबरोबरच महत्वाचे म्हणजे या ज्ञानाचा विस्तार होण्यासाठी आपण जितके नवनवे संशोधन स्वीकारणार आहे, तितकाच आपल्या देशाचा विकास जास्त आणि चांगला होणार आहे.

ज्यावेळी आपण नवकल्पना, नवसंशोधन यावर चर्चा करतो, त्यावेळी हा केवळ एक शब्द राहत नाही. त्याचबरोबर नवकल्नना, नवसंशोधन हा एक कार्यक्रमही नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या, परीक्षकांनी निकाल जाहीर केला आणि मग विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले आणि मग हा कार्यक्रम साजरा केल्यानंतर सगळे आपआपल्या घरी निघून गेले. इतकेच हे सगळे मर्यादित नाही. नवकल्पना, नवसंशोधन ही एक निरंतर चालत राहणारी, सातत्याने सुरू असणारी गोष्ट, प्रक्रिया आहे. ज्यावेळी तुम्हाला नेमकी काय समस्या आहे, हे समजणार आहे, त्याचवेळी त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, समस्येवर उपाय योजण्यासाठी तुम्ही नवसंशोधन करणार आहे. यासाठी नवनवीन कल्पना तुम्ही मांडणार आहात आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप प्रयत्नही करणार आहात.

यासाठी मी म्हणतो की, ‘आय ट्रिपल पी’! इथे आपल्यातील ‘आय’ जोडण्यात आला  आहे.  आय ट्रिपल पी म्हणजे, इनोव्हेट, पेटेंट, प्रोड्यूस, आणि प्रॉस्पर. या चार पायरी चढल्या तर आपल्या देशाचा विकास होणार आहे आणि तोही अतिशय  वेगाने विकास होणार आहे. आपण जे काही नवकल्पनेतून साकार करणार आहे, त्याचे ताबडतोब पेटेंट म्हणजेच बौद्धिक स्वामित्वही घेतले पाहिजे. त्याचबरोबर या नवीन संशोधनाचे उत्पादन कसे लगेच घेता येईल, उत्पादनाचा मार्ग कसा लवकर प्रशस्त होईल हे आपण पाहिले पाहिजे. तसेच आपण उत्पादन केलेले नवसंशोधन लोकांपर्यंत कसे लवकर पोहोचेल याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे आपलाच वेगाने भरभराट होणार आहे. विकास होणार आहे.

यामुळेच आमचे सरकार नवसंशोधन, नवकल्पनांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. ‘अटल इनोव्हेशन मिशन -एआयएम’ च्या माध्यमातून देशामध्ये नवसंकल्पना आणि नवउद्योजकांसाठी एक कार्यसंस्कृतीच तयार करण्यात येत आहे. हे करण्यामागे आमचा उद्देश असा आहे की, विद्यार्थ्‍यांना अगदी लहान वयामध्येच भविष्यात त्यांना आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय झाला पाहिजे. त्यासाठी एक स्वतंत्र ‘इको सिस्टिम’ तयार झाली पाहिजे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, थ्री डी, आणि रोबोटिक्स यांचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जाण्याची वाट पाहण्याची आवश्यकता लागू नये. त्याआधीच शालेय वयात विद्यार्थ्‍यांना हे सगळे माहिती झाले पाहिजे.

लहान वयामध्येच नवसंशोधन, नवकल्पना यांच्याविषयी जाणून घेण्याची मानसिक तयारी त्यांची झालेली असावी, या हेतूने आम्ही देशभरामधील जवळपास 2400 शाळांची निवड केली आहे. भविष्यामध्ये या शाळांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ही संख्या 30हजारपर्यंत नेण्याची सरकारची इच्छा आहे. या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करण्यात आल्या असून त्यामध्ये इयत्ता सहावी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्‍यांवर फोकस करण्यात येत आहे. या लब्स्मध्ये शैक्षणिक विषयांच्या संकल्पनांची प्रत्यक्षात, व्यवहारामध्ये कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येवू शकते, हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकवण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रयोगातून शिक्षण दिले जात आहे.

कुमारवयातल्या मुलांची जर एकदा का नवसंकल्पना, नवसंशोधन स्वीकारण्याची मानसिकता  तयार  झाली की, तुमचं अर्धेअधिक काम झालं असंच समजा. यानंतर संशोधनाचे मार्ग अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करण्याची गरज असते. आणि म्हणूनच उच्च तंत्रज्ञान शिक्षणाच्या काळात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूदही करण्यात आली आहे.

सरकारने ‘पीएमआरएफ’ म्हणजेच प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्तीचीही घोषणा केली आहे. आणि मला वाटतं की, आपल्यासारख्या नवयुवकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. या शिष्यवृत्तीअंतर्गत आयआयटी, आयआयएससी, एनआयटी यासारख्या संस्थांमधील बी.टेक, एम.टेक, आणि एम.एस.सी.च्या उत्कृष्ट विद्यार्थ्‍यांना प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दरवर्षी एक हजार विद्यार्थ्‍यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्‍यांना पाच वर्षांपर्यंत  दर महिन्याला 70 ते 80 हजार रूपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा आणि परिसंवाद यामध्ये आपले संशोधनपत्रे सादर करण्यासाठी दोन लाख रूपयांचे अनुदानही सरकारच्यावतीने देण्यात येणार आहे.

मित्रांनो, दुस-या महायुद्धानंतर ज्या देशांनी अतिशय वेगाने प्रगती केली, त्यामध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे, त्यांनी आपल्या देशातल्या उच्च शिक्षण देत असलेल्या संस्थांना  जास्तीत जास्त स्वायत्तता दिली आणि त्या संस्था अतिशय चांगले काम करत राहिल्या. शैक्षणिक संस्थांच्या विकासाला प्राधान्य दिले या कार्याला सर्वोच्च स्थान दिले. मोठ्या संस्थांमधून पुढे  आलेल्या नवसंकल्पना, नवसंशोधन यांचा लाभ आर्थिक विकासासाठी पायाभरणी करण्यासारखा असतो.

या कारणांमुळे आमच्या सरकारनेही देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देण्याचे धोरण निश्चित केले आहे. देशामध्ये जागतिक दर्जाच्या 20 शैक्षणिक संस्था निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील निवडण्यात आलेल्या 10 शैक्षणिक संस्थांना 10हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत सरकारच्यावतीने देण्यात येणार आहे.

एका बाजूला आम्ही भविष्याचा विचार करून एक ‘इको सिस्टिम’ तयार करीत आहोत. त्याचबरोबर स्टार्ट-अप इंडिया यासारख्या योजनांच्या माध्यमातून नवीन स्टार्ट-अप आणि नवउद्योजक तयार करण्याचं काम करण्यात येत आहे. ज्यावेळी ही योजना सर्वप्रथम अंमलात आणण्यात आली, त्यावेळेपासून  6हजार स्टार्ट-अप मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व स्टार्ट-अप्सना सरकार आर्थिक मदत देत आहे.

मित्रांनो, नवसंकल्पनेच्या संस्कृतीबरोबरच जागतिक पातळीवर होत असलेल्या बदलांचे आव्हान लक्षात घेवून आपल्यामध्ये तसे आवश्यक ते बदल करण्याची नितांत गरज असते. हळद, नीम, बासमती तांदूळ, यासारख्या गोष्टींचे स्वामित्व इतर देशांनी घेतले, त्यावेळी आपल्या देशाला किती त्रासदायक दिवसांना सामोरे जावे लागले. तो काळ किती कष्टदायक होता, हे मी चांगलेच जाणून आहे. आणि म्हणूनच आमच्या सरकारने बौद्धिक स्वामित्व संपदा आणि ‘स्वामित्व’ कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा आणि एकूणच या कार्यपद्धतीमध्ये  बदल करण्याचा निर्णय घेतला. याचे चांगले परिणाम आता दिसून आले आहेत. आधीच्या सरकारच्या काळाच्या तुलनेपेक्षा जवळपास तिप्पट संख्येने बौद्धिक स्वामित्व नोंदणीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वृद्धी झाली आहे. विशेष म्हणजे ‘ट्रेडमार्क’ नोंदणीमध्येही तीन वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. 2013-14मध्ये जवळपास 68हजार ‘ट्रेडमार्क’ म्हणजेच व्यापारचिन्हांची नोंदणी झाली होती. आता हा आकडा वाढून अडीच लाखाच्या पुढे गेला आहे.

नवकल्पना आणि स्वामित्व यांच्या जोडीनेच आमच्या सरकारने उत्पादनावर संपूर्ण भर दिला आहे. आता ‘मेक इन इंडिया’ असा अनोखा एक ब्रँड बनला आहे. आणि त्याची संपूर्ण दुनियेमध्ये चर्चा होत आहे. हे सांगताना आपल्याला आत्ता मी फक्त एका क्षेत्राचे उदाहरण देणार आहे. त्यावरूनच आपल्याला संपूर्ण कल्पना नक्कीच येईल. मित्रांनो, चार वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये मोबाईल फोन बनवत असलेले फक्त दोन म्हणजे दोनच कारखाने होते. आणि आपण सगळे नवतरूण आहात. या क्षेत्राशी तुमचा चांगला संपर्क येत असतो. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्राची बरीच माहितीही असते. एक लक्षात घ्या, चार वर्षांपूर्वी देशात मोबाईलचे दोनच कारखाने होते. आता या चार वर्षाच्याआत आपल्या देशाच्या विकासाने चांगलीच गती पकडली आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियान जोरात सुरू आहे. त्यामुळे मोबाईल बनवत असलेल्या कारखान्यांची संख्या आता 120 झाली आहे.देशाच्या अनेक भागात मोबाईल बनवण्याचे कारखाने आहेत.

ज्यावेळी नवकल्पना, स्वामित्व आणि उत्पादन यांचा वेग वाढून, चांगल्या प्रकारे, वेगाने काम केले गेले तर समृध्दीही अतिशय वेगाने येते. परंतु मित्रांनो, या सगळ्याशी एक अतिशय महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. अखेर या  सगळ्या नवकल्पना नेमक्या आहेत कोणासाठी? त्या आपल्या स्वतःसाठी आहेत, आपल्या देशासाठी आहेत  की आमच्या देशातल्या गरीब-दुखी बांधवांसाठी आहेत? आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहेत की, देशाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहेत?

हा प्रश्न नवतरूण मित्रांसमोर मी मुद्दाम करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर,  वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये, एखाद्या शास्त्राला वाहिलेल्या नियतकालिकामध्ये, विज्ञान तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये आपले संशोधनपत्र छापले जाईलही. परंतु आपण संशोधन करून तयार केेलेले उत्पादन वापरले जाईल, आणि त्याचा कोणाला लाभ झाला, तर अधिकच आनंद होणार आहे. आपण बनवलेल्या गोष्टीचा देशाला फायदा झाला पाहिजे. ती वस्तू अतिशय उपयोेगी ठरणारी असली पाहिजे. लोकांचे कष्ट कमी झाले पाहिजेत. या सगळ्यांचा विचार करून तुम्ही कोणत्या प्रकारची नवकल्पना राबवायची, याचा विचार केला जावा. देशासाठी काम केले जावे. देशापुढे निर्माण होत असलेल्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे.

या देशामध्ये ‘मल्टिपल हॅकेथॉन’चे आयोजनही करता येवू शकणार आहे. यामध्ये ‘हेल्थ हॅकेथॉन, लॉ हॅकेथॉन, आर्किटेक्ट हॅकेथॉन, अॅग्रीकल्चर हॅकेथॉन, आणि ग्रामीण हॅकेथॉन, अशा गोष्टीचे आयोजन आपण करू शकतो. आपल्या देशाला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करीत असलेल्या, नवसंकल्पनांचा विचार करीत असलेल्या माणसांची गरज आहे. त्यामध्ये कृषीतज्ज्ञ असावेत, वास्तू-स्थापत्य विशारद असावेत. वैद्यकीय क्षेत्रातले असावेत, विधिज्ञ असावेत, व्यवस्थापक असावेत. या सगळ्यांची आवश्यकता आपल्याला आहे.

अशा प्रकारचे हॅकेथॉन नवीन प्रतिभांना एक वेगळे व्यासपीठ देणारे माध्यम बनू शकते, अशी आशा मला आहे. हॅकेथॉनच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंबंधीचे प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न, स्वच्छतेविषयीचे प्रश्न, सोडवण्यासाठी नवनवे शोध आपल्यासमोर येवू शकतील.

या देशातील सर्वसामान्य लोकांना रोजच्या जगण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. त्यांच्या अनेक समस्यांना हॅकेथॉनच्या माध्यमातून उत्तरे मिळतील, आणि त्यांचे जीवन थोडे सुखकर होईल. त्याचबरोबर आपण केलेल्या नवसंशोधनामुळे आपल्याकडून देशसेवेचे कार्य होणार आहे.

आपण सगळ्यांनीच या हॅकेथॉनमध्ये उच्च श्रेणीच्या प्रतिमा घेण्यासाठी ड्रोन्सचा वापर कसा करता येईल, यावर काम केले आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. आता याच्याशी संबंधित काही नवकल्पना तुम्ही प्रत्यक्षात आणल्या तर त्या माध्यमातून तुम्हीही देशाची खूप महान सेवा करणारे ठरू शकता.

ड्रोन्सचा वापर करून, छायाचित्रे काढून आमच्या सरकारने योजनांचे निरीक्षण कशा पद्धतीने केले, हे जाणून तर तुम्ही आश्चर्यचकीत होणार आहात. आज प्रधानामंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या घरकुलांची निर्मिती केली जात आहे. प्रधानमंत्री जलसिंचन योजनेअंतर्गत ज्या ज्या योजनांचे काम अर्धवट राहिले होते, ते काम पूर्ण करण्यात येत आहे. मनरेगाच्या माध्यमातून जे कार्य केले जाते, त्यामध्ये ‘जिओ टॅ‍गिंग आणि मॅपिंग यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.

गेल्या महिन्यामधील गोष्ट म्हणजे, प्रगतीचा आढावा घेणारी बैठक सुरू होती. त्यावेळी आम्ही ड्रोन कॅमेरा वापरून त्या कामाची प्रत्यक्ष समीक्षा केली. केदारनाथ घाटी क्षेत्रामध्ये जे निर्माणाचे काम सुरू आहे, ते नेमके किती पूर्ण झाले, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. वास्तविक त्या भागामध्ये त्यावेळी खूप बर्फवृष्टी होत होती. प्रत्यक्ष संपर्क साधण्यात तांत्रिकदृष्ट्या अवघड बनले होते. तरीही  प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाचे एक चित्र माझ्यासमोर सादर करण्यात आले. दिल्लीमध्ये बसून मी स्वतः त्या घाटामधल्या कामाचे निरीक्षण करू शकलो. आता आपणही नवे काही शोधून काढाल तर आगामी काही दिवसांमध्ये अशा गोष्टींचा वापर अगदी सर्वसामान्य होणार आहे.

माझ्या नवयुवक मित्रांनो, तुमच्यापैकी काही लोकांना माहीत नसेल, प्रगती आढावा बैठकीमध्ये आमच्या सरकारने निरीक्षणासाठी आधुनिक कार्यप्रणाली विकसित केली आहे. यामध्ये प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आम्ही सगळे संबंधित अधिकारी वर्गही बसतो. राज्यांमधील संबंधित विभागाचे अधिकारी उपग्रहाच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले असतात. अशा वेळी सगळ्या योजनांचे ‘रिअल टाईम मॉनिटरिंग’ केले जाते. एखाद्या योजनेला पूर्ण होण्यास विलंब होत असेल तर असा उशीर का होतो आहे? नेमकी समस्या काय आहे? काम किती पूर्ण झाले, आणखी राहिलेले काम कधीपर्यंत पूर्ण होवू शकणार आहे? ही सगळी माहिती आम्हाला मिळू शकते.

मित्रांनो, आता काळ बदलतोय. अशा आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही त्या देशाच्या नवकल्पना क्षमतेवर अवलंबून असणार आहे. आपल्या देशांमध्ये साधनांची कमतरता अजिबात नाही. स्त्रोतांची कमतरताही नाही. आपल्यासारख्या नवतरूणांमध्ये सामर्थ्‍य हवेच हवे आणि ते तुमच्यामध्ये भरपूर आहे. माझा एक आग्रह तुम्हाला आहे. आपण सर्वजण जितकी स्वप्न पाहायची आहेत, तितकी पाहा. स्वप्ने कितीही पहायला काही हरकत नाही. परंतु ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावलेही जरूर उचला. तुम्ही पाहिलेले एकही स्वप्न अपूर्ण राहिलं आहे, ते मृत झाले आहे, असं अजिबात होवू देवू नका. ज्यावेळी तुम्ही आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करणार आहे, त्याचवेळी कितीही संकटे आली तरी तुम्ही लक्ष्य प्राप्त करू शकणार आहे.

एक तुम्ही कायम स्मरणामध्ये ठेवा, मी ज्या पिढीतला आहे, तुम्ही ज्या पिढीतले आहात, याचा विचार केला तर, आपल्यापैकी कोणालाच या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढावं, झगडावं लागले नाही. तुरूंगांमध्ये आपल्याला कधीच जावे लागले नाही. आपले तारूण्य देशासाठी घालवण्याची संधीही तुम्हाला आणि मला मिळाली नाही. देशासाठी मरण पत्करण्याची संधीही मिळाली नाही. तरीही आपल्या सगळ्यांनाच या देशासाठी जगण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे, असे मी मानतो. देशासाठी भले मरण्याचे नाही तर जगण्याची संधी तरी आपल्याला मिळाली आहे. देशासाठी जगण्याची मिळालेली संधी अशी वाया घालवून उपयोग नाही. आणि म्हणूनच आपली प्रतिभा, आपले सामर्थ्य, या देशासाठी वापरले पाहिजे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला वापर देशासाठी कशास पद्धतीने करता येईल, याविषयी सातत्याने विचार करीत रहावे. प्रयत्न करीत रहावेत.

मित्रांनो, मी पाहतोय, तुम्ही मंडळी आज सकाळपासून इथे बसून आहात, आणि अजून उद्या रात्रीपर्यंत थांबणार आहात. 36 तास हा कालावधी खरंच खूप मोठा असतो. आज मलाही तुमचे अनुभव ऐकण्याची उत्सुकता आहे. आपण सध्या खूप तणावात आहात. हा ताण कमी करण्यासाठी, तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटावे म्हणून  तुमच्याकडून प्राणायाम करून घेण्यात येत असेल. दीर्घ श्वास घ्यायला सांगत असतील, हात-पाय वर करून थोडा काळ योग करण्यासही सांगत असतील. यामुळे  मनावरचा ताण कमी होण्यास, मन मोकळे होण्यास मदत मिळणार आहे. ताण कमी झाला की, तुम्हाला नवं नवे विचार सुचणार आहेत. आपल्याला दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी माझ्याकडूनही तुम्हाला मदत मिळणार आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1528044)
Read this release in: English