युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भंडारा जिल्हयात क्रीडा विषयक सुविधा सुधारण्याकरिता सिथेंटीक ट्रॅक, इनडोर स्टेडीअम यापैकी एक सुविधा केंद्र शासन त्वरित देईल - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकुर यांची घोषणा
भंडारा जिल्ह्यातील खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यकमात ठाकुर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
Posted On:
19 MAR 2023 10:04PM by PIB Mumbai
भंडारा / नागपूर 19 मार्च 2023
भंडारा जिल्ह्यात खेलो इंडियाच्या तलवारबाजी (फेन्सिंग) चे खेलो इंडिया केंद्र असून या जिल्हयात क्रीडा विषयक सुविधा अजून सुधारण्याकरिता सिथेंटीक ट्रॅक , इनडोर स्टेडीअम यापैकी एक सुविधा केंद्र शासन त्वरित देईल अशी घोषणा केद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज भंडारा येथे केली .भंडारा येथे लक्ष्मी सभागृहात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यकमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार क्रीडा महोत्सवाच्या विविध खेळाप्रकारात पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडू तसेच सघांचा सत्कार यावेळी अनुराग ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला .
आपण भंडारा जिल्ह्यातील खेलो इंडियाच्या तलवारबाजी (फेन्सिंग) खेळ प्रकार असणाऱ्या खेलो इंडिया केंद्राचा दौरा केला . त्यावेळी मला 7 ते 10 वी इयत्तेतील मुले फेन्सिंगचा सराव करतांना दिसली . या मुलांचा उत्साह बघता गत वर्षीच्या ऑल्मिपिक स्पर्धेत फेन्सिंग प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भवानी देवी यांच्यासारखेच खेळाडू भंडाऱ्यातून निघतील अशी अपेक्षा केद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केली.
खेळाडूमध्ये जीवनात संघर्ष करण्याची क्षमता आधीच विकसित होते , त्याला जीवनातील उतार चढाव दिसून येतात , नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये विकासित होतात असे सांगून अनुराग ठाकुर म्हणाले कि एक पुस्तक तुम्हाला जेवढे शिकवू शकत नाही तेवढे एक खेळाचे मैदान शिकवते .
केद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदीवर बोलताना ठाकुर यांनी सांगितले की, खेळ आणि युवा व्यवहार मंत्रालयासाठी अभूतपूर्व अशी 3,397 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम TOPS च्या माध्यमातून देशभरातील प्रतिभावान खेळाडूंना ओलंपिक्स तसेच आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
खेळ हा विषय राज्यसुचीत असल्याने राज्यांनी कीडा विकासात भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले . मागील वर्षी मध्यप्रदेशच्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला याबदल त्यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी खासदार सुनिल मेंढे यांनी खासदार कीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात युवक युवती उपस्थित होते .
***
S.Rai/D.Wankhede/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908624)
Visitor Counter : 91