अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात

अणु ऊर्जा विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांचा एमएसएमई उद्योगांसाठी वापर करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 22 DEC 2022 6:24PM by PIB Mumbai

मुंबई, 22 डिसेंबर 2022

अणू ऊर्जा विभागाची महत्वाची बहुशाखीय संशोधन संस्था असलेल्या मुंबईतल्या भाभा  अणू संशोधन केंद्रात आज, म्हणजेच 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली.  याच वेळी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- एमएसएमई उद्योगांसाठी, अणु ऊर्जा विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांचा उपयोग करण्याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. सामाजिक आणि औद्योगिक उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

बीएआरसी चे संचालक डॉ अजित कुमार मोहंती, अटल इनोव्हेशन मिशनचे प्रतिनिधी, निती आयोगाचे प्रतिनिधी आणि अणू उर्जा विभागातील  वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अटल इनोव्हेशन मिशन अर्थात एआयएमच्या कार्यकक्षेअंतर्गत स्थापन झालेले हे बीएआरसी- अटल इन्क्युबेशन केंद्र, अणू उर्जा विभागाच्या  तीन आत्मनिर्भर प्रकल्पांपैकी एक म्हणून स्थापन करण्यात आले आहे, 2020 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला अनुसरून ही स्थापना झाली आहे. एआयसी-बीएआरसी, केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर उपक्रमाला चालना देईल. तसेचभारतात स्टार्ट अप्स आणि इतर अभियांत्रिकी उद्योगांना चालना देण्याचेही उद्दिष्ट असेल. यातून रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

एआयसी-बीएआरसी च्या अतिशय काळजीपूर्वक विकसित करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, विकसित होत असलेल्या उद्योगांना, बीएआरसीच्या शास्त्रज्ञांच्या  ज्ञानाचे पाठबळ मिळेल, जेणेकरून हे उद्योग, डीएईच्या तंत्रज्ञानाच्या बळावर, आपली उत्पादने  बाजारपेठेसाठी तयार आणि विकसित करु शकतील.

अशा विकसित होत असलेल्या उद्योगांना, बीएआरसीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रवेश मिळू शकेल आणि तिथे त्यांना आपली उत्पादने तंत्रज्ञानदृष्ट्या अधिक विकसित करता येतील.

ज्यासाठी, हा इन्क्युबेशन  करार करण्यात आला, आहे, ती तंत्रज्ञाने, भारताच्या नेट झीरो या जागतिक कटिबद्धतेशी सुसंगत आहेत. त्याशिवाय, सुरक्षित पेजजलाची सर्वांसाठी उपलब्धता, आणि देशात परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी संभाव्य आयात पर्यायांच्या वाढीला चालना देण्याच्या जागतिक वचनबद्धतेशी देखील सुसंगत आहेत. यामध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी अल्कलाइन वॉटर इलेक्ट्रोलायझरच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे; सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी डीसी अॅक्सलेरेटर; नवीन गामा मॉनिटरिंग; आणि रेडिओथेरपी मशीनसाठी X-Band LINAC-आधारित क्ष-किरण स्त्रोत यांचाही समावेश आहे.

सामाजिक आणि औद्योगिक प्रयोगांसाठी तंत्रज्ञानाचे समृद्ध भांडार तयार करण्याची प्रक्रिया, बीएआरसी सातत्याने करत आहे. यापैकी अनेक तंत्रज्ञाने, एआयसी-बीएआरसी कडून, उदयोन्मुख उद्योजक आणि उद्योग भागीदारांना विकसित होण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

या तंत्रज्ञांनाची सविस्तर माहिती, http://www.barc.gov.in/technologies/incubation_centre.html वर उपलब्ध आहे. तसेचएआयसी-बीएआरसीशी incubation@barc.gov.in. या मेलवरही संपर्क साधता येईल.

अटल इनोव्हेशन मिशन विषयी माहिती (AIM):

नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा नावीन्यपूर्ण आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा प्रमुख देशव्यापी उपक्रम आहे. अटल इनोव्हेशन मिशन मुळे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना खतपाणी घातले जाते तसेच भारतातील उद्योजकता व्यवस्थेला चालना देण्यासाठी सहकार्याच्या संधीही निर्माण केल्या जातात: या संस्थेविषयी https://aim.gov.in/

अटल इनक्यूबेशन सेंटर (AIC) बद्दल:

स्टार्ट-अप्स आणि उद्योजकांची सतत विकसित होणारी व्यवस्था तयार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशन इतर विद्यापीठे, संस्था आणि कॉर्पोरेट्समध्ये अटल इनक्यूबेशन सेंटर्स (AICs) नावाच्या जागतिक दर्जाच्या इनक्यूबेटर्सची स्थापना करत आहे. या केंद्रांचे उद्दिष्ट जागतिक दर्जाच्या नवकल्पना आणि गतिमान उद्योजकांना -ज्यांना शाश्वत आणि वाढीस वाव असणारे उद्योग विकसित करायचे आहेत, त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणे हे  आहे.

एआयसी बद्दल अधिक माहिती : Atal Innovation Mission (AIM)

 

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1885816) Visitor Counter : 290


Read this release in: English