रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अहमदनगर जिल्हा आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Posted On: 19 NOV 2022 6:57PM by PIB Mumbai

 

अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या  30 हजार कोटीच्या कामामुळे जिल्हा देशाच्या नकाशावर येणार असून आगामी काळात नगर जिल्हा लॉजीस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदनगर येथे केले. राष्ट्रीय महामार्ग-६१ वर अहमदनगर येथे ३३१.१७ कोटी रुपये किंमतीच्या व ३.८ किमी लांबीच्या ४-लेन एलेव्हेटेड स्ट्रक्चर उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार  सदाशिव लोखंडे, खासदार डॉ . सुजय विखे पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून  13 कामे  पूर्ण झाली आहेत  24 कामे प्रगतीपथावर आहेत. 6 कामे लवकरच सुरू होणार आहेत सध्या 17हजार 228 कोटी ची कामे सुरू आहेत.अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन मोठ्या ग्रीन फिल्ड हायवे मुळे नगर शहर जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे , अशी माहिती गडकरी यांनी दिली .अहमदनगर ते पुणे या रस्त्यावर होणारी रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी 56 किमी लांबीचा डबल डेकर रोड तयार करण्यात येणार आहे तसेच नगर कल्याण या माळशेज घाटातील रस्त्यासाठी  168 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्याने लोकार्पण झालेल्या या उड्डाणपुलामुळे स्थानिक वाहतूक व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. रहदारीच्या रस्त्यावरून कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल. प्रवास सुरक्षित होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमाला स्थानिक लोक प्रतिनिधी , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

***

D.Wankhede/P.Kor

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877324) Visitor Counter : 87