भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत 9 नोव्हेंबर रोजी पुणे येथे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Posted On: 07 NOV 2022 6:47PM by PIB Mumbai

पुणे, 7 नोव्हेंबर 2022

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ 9 नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी 6.30 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत  असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहे.

उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजेवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योगसंस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी करण्यासाठी, मतदार नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ येथे 10 नोव्हेंबर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर 26 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत.  मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पात्र मतदारांच्या अर्जावर वरील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल.

छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम शुभारंभ निमित्ताने भारत निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केले आहे.

Source - DIO Pune

 

M.Iyengar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1874322) Visitor Counter : 4506