उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सार्वजनिक क्षेत्रात चर्चा आणि संवाद मजबूत करण्याचे केले आवाहन

‘माध्यमांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, वेगळ्या आणि दुर्लक्षित आवाजांना बोलण्याची संधी देऊन मुख्य प्रवाहात येऊ द्यावे’, धनखड यांचे आवाहन

'सामाजिक रचनेची चौकट आणि समाज माध्यमांच्या जोखडातून बाहेर येऊन मोकळा श्वास घ्यायची वेळ आता आली आहे': उपराष्ट्रपती

Posted On: 22 SEP 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

सार्वजनिक क्षेत्रात चर्चा आणि संवाद मजबूत करण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. प्रज्ञा प्रवाह तर्फे आयोजित ‘लोकमंथन’या राष्ट्रीय संभाषणाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज गुवाहाटीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.इतरांच्या दृष्टिकोनाविषयीची असहिष्णुता, विचारांच्या मुक्त देवाणघेवाणीला विरोध करते, असे त्यांनी सूचित केले. भारताला वादविवाद, चर्चा आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा मोठा वारसा असल्याचे स्मरण  उपराष्ट्रपतींनी करून दिले. भूतकाळातून धडे घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील, विशेषत: विधिमंडळांमध्ये चर्चेचा दर्जा उंचावला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

समाजमाध्यमांवर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात जनतेच्या डोळ्यासमोर सुरू असलेल्या चर्चा, वरचढपणासाठी एकमेकांवर चढाओढ करताना कर्कश लढायांमधे रूपांतरित होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.  प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण करावे, एकमेवाद्वितीय, मूळ आणि दुर्लक्षित आवाजांना मुख्य प्रवाहात येऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. निरोगी, मोकळ्या मनाच्या चर्चेचे आवाहन करून उपराष्ट्रपती म्हणाले की 'सामाजिक रचनेची चौकट आणि समाज माध्यमांच्या जोखडातून बाहेर येऊन मोकळा श्वास घ्यायची वेळ आता आली आहे'. आपल्याला ऐकण्याच्या कलेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे तसेच आपण संवादाची कला पुन्हा शोधली पाहिजे, या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक लोकाचारावर प्रकाश टाकल्याबद्दल  त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. त्यांच्यातील विविधतेमध्ये सांस्कृतिक प्रथांमधे  शांतता, सौहार्द आणि वैश्विक बंधुत्व या भारतीय मूल्यांचा प्रतिध्वनी असतो, असेही ते म्हणाले. उपराष्ट्रपतींनी भारतीय समाजातील बुद्धिवंतांची भूमिका अधोरेखित केली आणि त्याचा संदर्भ दिला. ऋषींनी राजांना ऐतिहासिकदृष्ट्या धोरणात्मक मुद्द्यांवर सल्ला दिला आणि समाजात सुसंवाद आणि स्थैर्य आणले, असे त्यांनी सांगितले. प्रचलित मुद्द्यांवर विचारवंतांनी बोलले पाहिजे असे सांगून  ते म्हणाले की जर आपल्या बुद्धिमंतांनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतला तर सध्याच्या काळात समाजातील हा अत्यंत महत्त्वाचा घटक कायमचा गप्प बसणार आहे. संवाद आणि विचारमंथनात त्यांनी मुक्तपणे बोलले पाहिजे जेणेकरून सामाजिक नैतिकता आणि औचित्य जपले जाईल, ‌अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संलग्न प्रधानता आणि  संविधानाची समृद्धता आणि विधानसभा वादविवादांची गुणवत्ता त्यांनी अधोरेखित केली. भारताने फार पूर्वीपासून जपलेल्या मुक्त, उत्साही आणि निरोगी चर्चा त्याचे महत्त्वाचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे अमृत आहे, असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी नागरी समाजातील विचारवंतांना निकोप चर्चा  करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले.विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या तीन स्तंभात सुसंवादी समतोल राखण्यासाठी बुद्धिमानांनी विचारपूर्वक सक्रिय भूमिका घेतली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. बुद्धिमानांनी संवाद आणि चर्चेची भूमिका घेतली तर लोकशाही मूल्ये आणि मानवी हक्कांची नक्कीच भरभराट होईल, असे ते पुढे म्हणाले.

आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी, आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा, प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार, लोकमंथन 2022च्या कार्याध्यक्ष  डॉ. गार्गी सैकिया महंता आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1861517) Visitor Counter : 176