उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कृषी संशोधन आणि विकासावर खर्च वाढविण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर

शेतक-यांसाठी शेती फायदेशीर करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न दुप्पट करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 14 MAY 2022 4:29PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज कृषी उत्पादकतेमध्ये दीर्घकालीन भरीव लाभ मिळविण्यासाठी देशातल्या कृषी संशोधनाची गुणवत्ता आणि क्षमता वाढविण्याचे आवाहन केले आहे.कोणताही प्रगत देश कृषीविषयक उपक्रमांचा विस्तार केल्याशिवाय कृषी उत्पादनामध्ये सुधारणा घडवून आणू शकत नाही. आपल्या देशाच्या कृषी जीडीपीच्या अवघे एक टक्का कृषी संशोधन आणि विकास यांच्यासाठी खर्च केला जातो असे नमूद करून नायडू यांनी कृषी संशोधन आणि विकास यावरील खर्चामध्ये वाढ करण्याची सूचना केली. पुढे बोलताना व्यंकय्या नायडू यांनी, शेती  ही हवामानानुसार लवचिक, फायदेशीर आणि शेतकरी बांधवांसाठी शाश्वत तसेच त्यातून पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी संशोधक, धोरणकर्ते, उद्योजक आणि शास्त्रज्ञांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपती आज हैद्राबाद इथल्या आयसीएआर -एनएएआरएम म्हणजेच राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था - राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीच्या,कृषी-व्यवसाय व्यवस्थापन   कार्यक्रमाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित होते.

कृषी विद्यापीठांनी नवीन तंत्र आणि शाश्वत उत्पादन पद्धती विकसित करण्याबरोबरच देशातल्या प्रत्येक भागातल्या शेवटच्या शेतकरी बांधवापर्यंत ही प्रगती पोहोचविणे आपले कर्तव्य मानले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी  गावोगावी भेट देवून त्यांनी प्रत्यक्षात शेतीच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन नायडू यांनी केले. ते म्हणाले, शेतक-यांना उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधनाचा लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॅब टू लँडहे घोषवाक्य सर्वांनी आत्मसात केले पाहिजे.

याविषयी सविस्तर बोलताना नायडू म्हणाले, शेतक-यांसाठी कोणतीही गोष्ट करताना जास्त तांत्रिक संकल्पना, शब्दांचा वापर  न करता अगदी सोप्या भाषेत सामुग्री द्यावी. त्यांना मोबाईलव्दारे विस्तारित सेवा द्यायच्या असतील तर त्यांच्या मागणीनुसार आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे गोंधळ उडणार नाही असे पर्याय आणि तशीच विना अडथळा सेवा  उपलब्ध करून द्यावी.

भारतीय कृषी व्यवसायामधील विविध उदयोन्मुख आव्हानांविषयीही नायडू यावेळी बोलले. यामध्ये पाण्याची घटती उपलब्धता, हवामान बदल, मातीची कमी होणारी प्रत, जैवविविधतेचे नुकसान, नवीन कीड आणि पिकांवर पडणारे रोग, शेतीचे होणारे तुकडे अशा अनेक समस्यांचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, अशा प्रश्नांमुळे कृषी संशोधनाचे कार्य आगामी काही वर्षांमध्ये अधिक गांभीर्याने करावे लागणार आहे’’.

अशा विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नायडू यांनी, आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्याची गरज आहे, असे सांगून यासाठी तांत्रिक नवकल्पना, मनुष्य बळ आणि विस्तारित सेवा यांमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. इतर क्षेत्रांसह जनुकशास्त्र, आण्विक प्रजनन आणि नॅनो तंत्रज्ञाना यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची सूचना त्यांनी केली. त्यांनी आयसीएआर संस्थांनी ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी समन्वय घडवून आणून उत्पन्न वाढविण्याचे तसेच उत्पादनांचा विकास करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपती नायडू यांनी कृषी व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी कुशल मनुष्य बळ निर्माण करण्यावर भर देण्याची गरज प्रतिपादन केली. प्रशिक्षित कृषी व्यवसायिक पदवीधर शेतीला अधिक संघटित क्षेत्र बनविण्याच्या दिशेने काम करू शकतात असे आपले निरीक्षण असल्याचे सांगून नायडू यांनी नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे तुम्ही बनू शकता, असे सांगितले.

***

N.Chitle/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825438) Visitor Counter : 192