माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ऑस्ट्रियन माहितीपट 'ब्रदर जेकब, आर यु स्लीपिंग?' ला मिफ २०१८ चा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार

श्याम बेनेगल यांचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Posted On: 03 FEB 2018 6:00PM by PIB Mumbai

 

मुंबई 3 फेब्रुवारी 2018

 

ऑस्ट्रियन चित्रपट निर्माते स्टीफन बोहून्स यांचा माहितीपट 'ब्रदर जेकब, आर यु स्लीपिंग?' ला यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे. गेले सात दिवस सुरु असलेल्या १५व्या मिफ ची आज सांगता झाली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते, या स्पर्धेतल्या विजेत्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

चार भावंडांचा, भूतकाळातला प्रवास  'ब्रदर जेकब, आर यु स्लीपिंग या माहितीपटात अत्यंत रंजकतेने चित्रित करण्यात आला आहे. पाचव्या भावाच्या आकस्मिक निधनानंतर इतर चार भाऊ त्याच्या स्मृती जागवतात.

यंदा सुवर्णशंख पुरस्काराची रक्कम १० लाख रुपये इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठीचा रौप्य शंख पुरस्कार अमर कौशिक यांचा चित्रपट 'आबा' आणि नाक्युन किम यांचा कोरियन चित्रपट 'माय टर्न' यांना विभागून मिळाला आहे

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या श्रेणीतला द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट माहितीपटासाठीचा गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार मराठी-हिंदी चित्रपट 'ट्रॅव्हलर्स' या चित्रपटाला मिळाला आहे. शार्ले अब्राहम आणि अमित माधेशिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटानं  सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचाही पुरस्कार जिंकला आहे

आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात प्रमोद पती विशेष ज्यूरी पुरस्कार बंगाली चित्रपट ‘आय एम बोनी’ या चित्रपटाला मिळाला. सतरूप संत्रा, फरहा खातून आणि सौरभ कांती यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, फिल्म्स डिव्हिजनने त्याची निर्मिती केली आहे.

राष्ट्रीय चित्रपट गटांच्या विभागात लघुपटासाठीचा (४५ मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा) रौप्य शंख पुरस्कार बंगाली चित्रपट ‘सखीसोना’ या चित्रपटाला मिळाला आहे. प्रतीक बसू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती एफ टी आय आय ने केली आहे.

राष्ट्रीय चित्रपट गटांत  सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार सुरेश एरियात यांच्या 'टोकरी'  या चित्रपटाला मिळाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट गटात माहितीपटांसाठी दोन विभाग करण्यात आले होते. त्यात एक तासापेक्षा कमी कालावधीचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा रौप्य शंख पुरस्कार मणिपुरी माहितीपट 'इमा साबित्री' या बोबो खुराइजाम यांच्या माहितीपटाला मिळाला तर एक तासापेक्षा जास्त अवधी असलेल्या गटात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार आर वी रहमानी यांच्या  'संथाल फॅमिली टू मिल रिकॉल' ला मिळाला.

त्याशिवाय ज्युरींनी दोन चित्रपटांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली आहे- यात बिजू टोपो आणि मेघनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या फिल्म्स डिव्हिजन निर्मित 'नाची से बांची' लघुपटाला आणि स्वाती चक्रवर्ती दिग्दर्शित ‘आय एम जिरा’ या इंग्रजी चित्रपटाला मिळाला आहे.

तांत्रिक पुरस्कार विभागात, सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कार, फिनलँडचा चित्रपट 'माय सिक्रेट फॉरेस्ट' याला मिळाला असून पिंजा मुस्ताजोकी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा पुरस्कार किसले यांना त्यांच्या इन्स्टास्टोरीस चित्रपटासाठी देण्यात आला.

राष्ट्रीय चित्रपट विभागात, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा पुरस्कार श्रेयस दशरथे यांचा गुजराती चित्रपट 'बिस्मार घर' ला मिळाला आहे. भारतीय माहितीपट निर्माते संघटना, आयडीपीए तर्फे ज्येष्ठ माहितीपट निर्मात्या विजया मुळ्ये यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो.

पदार्पणातल्या  सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार, हिंदी चित्रपट ‘बिलव्हड’ (जान जिगर) या रंजन चंदेल यांच्या चित्रपटाला मिळाला.

यावर्षीचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना प्रदान  करण्यात आला. चित्रपट आणि माहितीपट क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. १० लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

यंदाच्या मिफमध्ये एकूण ५८ लाख रुपये किंमतीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1519054) अभ्यागत कक्ष : 41